esakal | नव्या आघाडीचं ठरलं!
sakal

बोलून बातमी शोधा

congress-shivsena-bjp

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज (गुरुवारी) दिल्लीत सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. त्यात किमान समान कार्यक्रमावर सहमती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते मुंबईला जाऊन शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील.

नव्या आघाडीचं ठरलं!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज औपचारिक सहमती जाहीर केली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, यावर सहमती झाली. मात्र, सरकारचे स्वरूप आणि किमान समान कार्यक्रमावर दोन्ही काँग्रेसच्या वाटाघाटी अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यामध्ये खातेवाटप, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद, सहमतीच्या मसुद्याची शब्दरचना हे कळीचे मुद्दे असल्याचे समजते. वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित सरकारचा मसुदा शिवसेनेकडे सोपविला जाणार असून, येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण प्रक्रिया मार्गी लावण्याची दोन्ही पक्षांनी तयारी केली आहे. 

गेल्या तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेले सत्तानाट्य आता अंतिम टप्प्यात पोचले आहे. सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्णायक बैठक आज झाली. दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेला त्याबद्दल कळविले जाईल. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संयुक्तरीत्या सरकार स्थापनेची घोषणा करतील. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या भेटीत ठरल्याप्रमाणे दोन्हीही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची अपेक्षित असलेली चर्चा आज झाली. यासाठी दोन्ही पक्षांचे किमान समान कार्यक्रम आखण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे नेते दिल्लीत आधीच दाखल झाले होते. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी प्रारंभ करण्याआधी आज दुपारी काँग्रेसच्या नेत्यांची प्रथम सोनिया गांधींशी प्राथमिक चर्चा झाली. सोनियांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी महाराष्ट्रातील सरकार बनविण्याच्या औपचारिक वाटाघाटींना सुरुवात केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, नवाब मलिक, सुनील तटकरे सहभागी झाले होते. तर काँग्रेसतर्फे अहमद पटेल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते जयराम रमेश हेदेखील सहभागी झाले होते. सायंकाळी पाचला सुरू झालेल्या बैठकीचा पहिला टप्पा रात्री पावणेनऊच्या सुमारास संपला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेला दोन्ही पक्षांची सहमती झाल्याचे जाहीर केले. 

‘‘महाराष्ट्रात गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेली अस्थिरता संपविण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक होती. आणखी काही गोष्टींवर चर्चा बाकी असून ती आज किंवा उद्या पूर्ण होईल आणि लवकरात लवकर स्थिर, लोकाभिमुख सरकार अस्तित्वात येईल,’’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. तर, ‘‘राज्यात प्रशासन ठप्प असून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे लोकनियुक्त सरकार असावे यासाठी हा प्रयत्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सोबत आल्याशिवाय कोणतेही पर्यायी सरकार बनू शकत नाही. लवकरच सरकार स्थापन होईल आणि पाच वर्षे चालेल,’’ असा दावा नवाब मलिक यांनी केला. या निमित्ताने ‘‘राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असून स्वतःला चाणक्‍य म्हणविणाऱ्यांना आम्ही मात दिली आहे,’’ अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला. 

सरकारमध्ये सहभागाची दोन्ही पक्षांची तयारी असली तरी मुख्यमंत्रीपद पाचही वर्षे शिवसेनेकडेच राहावे यावर अद्याप सहमती नाही. शिवसेनेचा मुद्दा अडीच वर्षांचा होता, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी लक्ष वेधले. 

दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक आटोपल्यानंतर काँग्रेसचे नेते हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले. तेथे सोनिया यांना बैठकीची माहिती दिल्यानंतर ते परत पवार यांच्या निवासस्थानी आले. दोन्ही पक्षनेत्यांत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

शिवसेनेची मुंबईत बैठक
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रमुख नेत्यांची मुंबईत ‘मातोश्री’वर बैठक बोलावली होती. विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याशीही ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. येत्या शुक्रवारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला आमदारांनी येताना आधार, पॅन कार्ड व ओळखपत्र घेऊन यावे, अशा सूचना देण्यात आल्या.

सरकार स्थापन करण्यासाठी किमान कार्यक्रम तयार करावा लागतो. त्याच्या अंमलबजावणीसाठी रूपरेषेची आखणी करावी लागते. आघाडीच्या नेत्यांत दिवसभर याच मुद्‌द्यावर चर्चा झाली. चर्चा आता फार काळ लांबणार नाही. राज्याच्या हितासाठी महाराष्ट्रातील पर्यायी सरकारला सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिलेला आहे.
- संजय राऊत, खासदार शिवसेना

दिल्लीत आज पुन्हा बैठक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज (गुरुवारी) दिल्लीत सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. त्यात किमान समान कार्यक्रमावर सहमती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते मुंबईला जाऊन शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील. नव्या सरकारच्या स्थापनेबाबत शुक्रवारी मुंबईतूनच घोषणा करण्यात येऊ शकते.

loading image