
नवी दिल्ली : मजबूत काँग्रेस पक्षच विरोधी ऐक्याचा स्तंभ आहे. काँग्रेसला कमजोर करणे म्हणजे विरोधकांची एकजूट नाही हे अन्य पक्षांनी समजून घ्यावे, अशी सूचक टिप्पणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची राहील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यावर ही प्रतिक्रिया देण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांचे ऐक्य काँग्रेसच्या मजबुतीशिवाय शक्य नसून भारत जोडो यात्रा विरोधी ऐक्यासाठी नव्हे तर काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेनंतर सर्वांना कळाले आहे की हत्ती जागा झाला आहे. काँग्रेस काय करते याकडे सर्व पक्ष पाहत आहेत. भाजप तसेच आमच्या सहकारी पक्षांकडून प्रतिक्रिया येत राहतील. काँग्रेस मजबूत असल्यावरच विरोधकांची एकजूट शक्य आहे. विरोधकांचे ऐक्य याचा अर्थ असा नव्हे की काँग्रेसला आणखी कमजोर करणे. आम्ही स्वतःला आणखी दुबळे होऊ देणार नाही हे आमच्या घटक पक्षांनीही (युपीएतील) समजून घ्यावे, की मजबूत काँग्रेसच विरोधी ऐक्याचा स्तंभ आहे. भारत जोडो यात्रा विरोधी ऐक्यासाठी नव्हे तर काँग्रेसला बळकट करण्यासाठी आहे. यातून विरोधी ऐक्य मजबूत होणार असेल तर चांगलेच आहे. पण आमचे प्राधान्य काँग्रेसला प्रभावशाली बनविण्याचे आहे.
भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल रमेश यांनी प्रसार माध्यमांचे विशेष आभार मानले. ज्या राज्यांमध्ये भारत जोडो यात्रा जाणार नाही, त्या आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सांकेतिक यात्रा काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत जोडो यात्रेचा सोमवारी पाचवा दिवस असून यात्रेने ९४ किलोमीटरचा टप्पा ओलांडल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत जोडो यात्रेत चोरीच्या तक्रारी
तिरुअनंतपुरम, ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत पैसे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी शहर पोलिसांकडे आल्या आहेत. पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रण तपासले असता चोरांची एक टोळी यात्रेत सहभागींचे व रस्त्यावर यात्रा पाहणाऱ्यांचे खिसे चलाखीने कापत असल्याचे दिसले. तिरुअनंतपुरममध्ये ओणमनिमित्त सर्वत्र गर्दी आहे. तसेच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनिमित्त पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते शहरात आहे. या गर्दीचा फायदा उठवीत चोरांनी अनेकांचे पैसे पळविल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी व्हिडिओ चित्रणाच्या आधारे चार अट्टल चोरांना माग काढला असून त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.
राहुल गांधी यांच्या टी-शर्टवरून भाजपने केलेली टीका बालिशपणाची आहे. आम्हाला यावर काही बोलायचे नाही. आर्थिक, सामाजिक राजकीय आव्हाने लक्षात घेऊन काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. कंटेनर, टी-शर्ट, बुटांवर बोलायचे असेल तर याचा अर्थ ते घाबरले आहेत हे स्पष्ट आहे.
- जयराम रमेश, काँग्रेसचे नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.