‘एनडीए’चे एकेक पान लागले गळावया

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

एनडीएमधील सध्याचे पक्ष व लोकसभेतील त्यांचे बळ
भाजप (३०३)
जेडीयू (१६)
लोकजनशक्ती पक्ष (६)
शिरोमणी अकाली दल (२)
एआयझेडएसयू (१)
अपना दल (२)
अण्णा द्रमुक (१)

आसाम गण परिषद, पट्टली मक्कल काच्ची, रिपब्लिकन पक्ष, केरळ भारत धर्म जनसेना, डीएमडीके, पुथीया तमिलगम, तमिळ मनीला काँग्रेस, पीएनके, एआयएनआर काँग्रेस, पुद्दूचेरी, बोडोलॅंड पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, नागालॅंड, केरळ काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, राजस्थान या पक्षांचा एकही खासदार निवडून आलेला नाही. यातील रिपब्लिकन पक्षासह अनेकांच्या राज्यात त्या पक्षाचा आमदारच काय पण एखादा नगरसेवकही निवडून आलेला नाही.

मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेसह ऑल झारखंड स्टुडंटस्‌ युनियन, लोकजनशक्ती पक्ष यांनी भाजपची साथ सोडली. शिवसेनेने तर युतीला बहुमत मिळूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेतील ‘कमळाबाई’ला ‘जय महाराष्ट्र’ केला.

प्रादेशिक पक्षांबरोबर आघाड्या असल्या तरी केंद्रात सत्ता येताच त्यांना विलक्षण तुच्छतेने वागविण्याचा भाजपचा अलीकडचा लौकिक आहे. विशेषतः २०१४ नंतर ज्या ज्या पक्षांनी भाजपची साथ सोडली त्यातील बहुतेकांनी हाच आरोप भाजपवर केला आहे. राज्यात फारसे स्थान नसलेल्या, पण केंद्रीय नेतृत्वाच्या पाठिंब्याने नेतृत्व करणाऱ्या भाजप नेत्यांचा उन्मत्तपणा व अहंकारही शिगेला पोचल्याबाबत झारखंड, त्रिपुरा, हरियानापासून महाराष्ट्रापर्यंतच्या वाढत्या तक्रारी दिल्लीत येत आहेत, तरी त्याकडे लक्ष द्यावेसे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला अजून वाटत नाही, असे चित्र आहे.

सध्या कागदावर २१ मित्रपक्षांचा सहभाग असलेल्या व लोकसभेत साडेतीनशेच्या वर जागा असलेल्या एनडीएचे तडे व भेगा वाढत चालल्या आहेत. जे मोठे चार-पाच पक्ष आहेत त्यातील शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यावर जेडीयू, अकाली दल व अण्णा द्रमुक हे तीन मोठे म्हणावेत असे पक्ष एनडीएमध्ये उरले आहेत. 

शिवसेनेच्या पाठोपाठ रामविलास व चिराग पासवान यांनी झारखंडमध्ये भाजपशी काडीमोड करण्याची घोषणा केली आहे. नवीन पटनाईक यांनी ओडिशात कधीच वेगळी वाट धरली. उत्तर प्रदेशात मायावतींनी मागेच भाजपचा हात सोडला. पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी वाजपेयी युग संपल्यावर लगेचच एनडीए सोडली. 

अटलबिहारी वाजपेयी यांचे तीनपैकी एक सरकार एका मताने पाडण्यामागे ज्यांची मुख्य भूमिका होती त्या अण्णा द्रमुक नेत्या जयललिता यांनी भाजपला फारसी धूप घातली नव्हती. मात्र त्यांच्या निधनानंतर त्या पक्षातील दुफळीचा लाभ उठवून भाजपने हा पक्ष एनडीएमध्ये खेचला.

२०१९ च्या आधी तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी मोदी-शहांची साथ सोडली व तेथे नंतर सत्तेवर आलेले जगनमोहन रेड्डी एका अदृश्‍य दहशतीमुळेच भाजपच्या थेट विरोधात जाण्याचे टाळत असल्याची चर्चा आहे. कारणे काही का असेनात, पण काश्‍मीरमध्ये सत्तेसाठी भाजपने ज्यांच्याशी युती केली त्या पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नंतरच्या दीड वर्षात थेट अटकेत टाकून दिले. बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा भाजप नेतृत्वाच्या अहंमन्य वर्तनाने दुखावले आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाचीही धुसफूस सुरू आहे. 

भाजपने पाच दशकांत दोनदा दिल्लीच्या तख्तावर कब्जा केला, तर भाजप नेत्याने पाच वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. भाजप आघाडी मे १९९८ मध्ये अधिकृतरीत्या स्थापन झाली. त्याच्या आधी सुमारे दशकभर महाराष्ट्रात शिवसेना व भाजपने घरोबा केला होता. देशातील ही पहिली मोठी राजकीय आघाडी किंवा युती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यात भाजपने त्या काळात हात धुवून घेतले. 

२०१४ नंतर मात्र दिल्लीच्या भाजप नेत्यांचा नूर बदलला. २०१९च्या लोकसभेवेळी भाजप नेतृत्व पुन्हा चेहऱ्यावर हास्य व जिभेवर साखर ठेवून ‘मातोश्री’वर गेले. पण नंतर सहा महिन्यांतच उद्धव ठाकरे इतके का चिडले याचा शोध व बोध घेण्याची गरज दिल्लीश्‍वरांना का पडली नाही, असा जाणकारांचा सवाल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA power less candidate Politics