नीरज शेखर भाजपवासी झाल्यावर समाजवादी 'गुरूंच्या' शुभेच्छा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

- आज गुरूपौर्णिमेनिमित्त मी त्यांना (नीरज) शुभेच्छा देतो
- रामगोपाल यादव यांच्या नीरज शेखर यांना शुभेच्छा

नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व माजी खासदार नीरज शेखर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला. त्यांच्या पक्षत्यागाने समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला आहे. सपामध्ये नीरज यांचे गुरू मानले जाणारे रामगोपाल यादव यांनी या साऱ्या प्रकरणावर "आज गुरूपौर्णिमेनिमित्त मी त्यांना (नीरज) शुभेच्छा देतो,' अशी टिप्पणी केली.

राजकारणाची रेलगाडी ! 
सपामध्ये अखिलेश यांचे काका रामगोपाल यादव हे नीरज शेखर यांचे गुरू मानले जातात. नीरज यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यावर रामगोपाल यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, ""आज गरूपौर्णिमा आहे व त्यानिमितत माझ्या त्यांना (नीरज) शुभेच्छा आहेत,'' अशी मिश्‍किल टिप्पणी केली. सपातून मोठे नेते बाहेर जात आहेत का? यावर यादव म्हणाले की राजकीय पक्ष हे रेल्वेप्रमाणे असतात. मध्यंतरात येणाऱ्या प्रत्येक स्थानकावर काही जण उतरतात व नवे प्रवासी गाडीत चढतात. मात्र काही प्रवासी उतरले म्हणून रेल्वे रिकामी होत नाही ती कमीअधिक भरलेलीच रहाते.  

लोकसभा निवडणुकीत बलियातून तीकीट नाकारल्यावर नीरज शेखर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. तिकीट नाकारण्याचे कारण तरी मला सांगा, या त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आल्यावर ते संतापले. 2014 नंतर राज्यसभेत भाजपच्या विरोधातील तोफखाना नीरज शेखर हे प्रामुख्याने सांभाळत असत. त्यांच्या नाराजीची कुणकूण लागताच भाजपने त्यांच्याशी "चाय पे चर्चा' च्या निमित्ताने उत्तर प्रदेशात संपर्क साधला व त्यांना आपल्या बाजूला वळविण्यात यश मिळविले. शेखर यांच्या या नव्या "संपर्क मोहीमेचा' पत्ताही सपा नेतृत्वाला लागला नाही व माहिती समजली तेव्हा फारच उशीर झाला होता, असे समजते. 

राज्यसभेचा कालच राजीनामा देणारे शेखर यांनी आज संसदेत पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर ते भाजपाध्यक्ष अमित शहांच्याही दरबारात पोहोचले. दुपारी चार वाजता भाजप मुख्यालयात पक्षनेते भूपेंद्र यादव, अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत नीरज शेखर भाजपवासी झाले. यावेळी तिघांपैकी कोणीही प्रास्ताविकाच्या व्यतिरिक्त काही बोलले नाही. शेखर यांचा राज्यभा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2020 रोजी संपणार होता. मात्र सपावरील नाराजीमुळे दीड वर्ष आधीच त्यांनी पक्षत्याग केला. पुढील वर्षी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून निवडून आणण्याचा शब्द दिला गेल्याचे समजते. नीरज शेखर यांनी सपा सोडल्याने उत्तर प्रदेशात या पक्षाच्या पुढारलेल्या जातींच्या राजकारणाला मोठा धक्का लागल्याचे चित्र आहे. पूर्वांचल भागातील क्षत्रिय समाजात चंद्रशेखर व नंतर नीरज शेखर यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neeraj Shekhar Ex Samajwadi Joins BJP Hours After Meeting PM Modi