नेहरूंचा वैज्ञानिक द्रष्टेपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरूंचा वैज्ञानिक द्रष्टेपणा

नेहरूंचा वैज्ञानिक द्रष्टेपणा

sakal_logo
By
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

स्वातंत्र्योत्तर काळात देशभरात निरक्षरता, रोगराई, दारिद्र्य, अन्नधान्याची टंचाई सामाजिक आणि आर्थिक विषमता तसेच फाळणीमुळे आलेले लाखो विस्थापित अशा अनेक समस्या होत्या; परंतु अशा परिस्थितीत देखील भारताला नवसमाज निर्मितीचे स्वप्न देणारे आणि प्रत्यक्षात तो समाज घडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने कृतीशील प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून नेहरूंना ओळखले जाते.

डिसेंबर १९३७ मध्ये कोलकता येथील राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडेमीच्या कार्यक्रमात बोलत असताना जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, राजकारणात आल्यावर मी अर्थशास्त्राकडे वळलो आणि अर्थशास्त्रातून मला विज्ञान व वैज्ञानिक विचारांची ओळख होऊन त्याद्वारे समस्या तसेच आयुष्यातील अडचणी सोडविण्याची प्रेरणा मिळाली. अपार साधन संपत्ती असूनदेखील उपासमारीने ग्रासलेल्या श्रीमंत देशातील भूक, दारिद्र्य, अस्वच्छता, निरक्षरता, अंधश्रद्धा, मृतप्राय रूढी आणि परंपरा अशा समस्यांचे निराकरण केवळ विज्ञानच करू शकते.” स्वातंत्र्योत्तर काळात देशभरात निरक्षरता, रोगराई, दारिद्र्य, अन्नधान्याची टंचाई सामाजिक आणि आर्थिक विषमता तसेच फाळणीमुळे आलेले लाखो विस्थापित अशा अनेक समस्या होत्या; परंतु अशा परिस्थितीत देखील भारताला नवसमाज निर्मितीचे स्वप्न देणारे आणि प्रत्यक्षात तो समाज घडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने कृतिशील प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून नेहरूंना ओळखले जाते.

भारत स्वतंत्र होईपर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया घट्ट झाला होता. युरोप खंडात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे विज्ञान-तंत्रज्ञान युग अवतरले. जागतिक पातळीवर दोन महायुद्धे लढून झाल्यानंतर वाहतूक, दळणवळण, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली होती. युद्ध तंत्रज्ञानाने तर अगदी अणुबॉम्बपर्यंत मजल मारली. यंत्रस्वरूपातील संगणकांचे आगमन झाले होते, तर अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तेत अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतीत स्पर्धेला सुरवात झाली होती. अशा परिस्थितीत भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून नेहरूंनी पायाभरणीचे कार्य सुरू केले.

१९४२ मध्ये ब्रिटिश वैद्यकीय अधिकारी तसेच भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमन आणि सर जे. सी. घोष यांच्या पुढाकाराने विज्ञान आणि उद्योगाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेची (सीएसआयआर) स्थापना करण्यात आली. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने नवनवीन तंत्रप्रणालींचा शोध घेणे, विज्ञान-तंत्रज्ञानात सक्षम नेतृत्त्व पुरवणे, विकसित विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत उद्योगजगताला मार्गदर्शन करणे तसेच या विकासाचा प्रसार करत देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील राहणे; या उद्देशांना समोर ठेवत सीएसआयआरचे काम स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केले. आजही सीएसआयआरचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे असते. अंतरिम सरकारच्या कालावधीत नेहरूंनी घटना समितीमध्ये अणु ऊर्जा कायदा पारित केला आणि १९४८ मध्ये अणु-ऊर्जा आयोगाची स्थापना केली. अणुऊर्जा खात्याचा कारभार त्यांनी स्वतःकडे ठेवला. १९५० मध्ये युरेनियमच्या उत्खननासाठी इंडियन रेअर अर्थ लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. तसेच जून १९५० मध्ये मुंबईतील ट्रॉम्बे येथे अणुऊर्जा संशोधन केंद्राची उभारणी केली.

नेहरूंच्या कालावधीत अनेक क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित संशोधन सुरू करण्यात आले. आरोग्य आणि औषध निर्मिती क्षेत्रात सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट , हाफकिन इन्स्टिट्यूट, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससारखी (एम्स) महाविद्यालये आणि पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेरॉलॉजी सारख्या मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थांचा पाया रचला. संरक्षणमंत्र्यांना वैज्ञानिक सल्लागाराचे पद निर्माण करण्यात आले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा विस्तार आणि सक्षमीकरण केले गेले. तसेच नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या पहिल्या राष्ट्रीय प्रयोगशाळेची दिल्लीत स्थापना करण्यात आली. नेहरूंच्याच कालावधीत एकूण १७ राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण तसेच व्यवस्थापन अभ्यासासाठी आयआयटी आणि आयआयएमची स्थापना नेहरूंनीच केली. त्याचसोबत प्रत्येक वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इंडियन सायन्स कॉंग्रेस ही परिषद भरविण्यास सुरुवात झाली. आपल्या १७ वर्षाच्या करकीर्दीत फक्त ३ वर्षे सोडून नेहरू इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या प्रत्येक परिषदेला उपस्थित राहिले.

नेहरूंनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अर्थसंकल्पीय तरतूद ८५ पटीने वाढली. १९४७-४८ मध्ये १.१० कोटी रुपये असलेली तरतूद १९६५-६६ पर्यंत ८५ कोटी रुपये झाली होती. १९५० मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या १.८८ लाख होती. ती वाढून १९६४ मध्ये ७.३१ लाख झाली होती. याच दरम्यान इंजिनीअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार वरून वाढून ७८,००० झाली.

कोरोनाची साथ रोखण्यात आधुनिक विज्ञान आणि जगभरातील वैज्ञानिकांची मध्यवर्ती भूमिका आहे. भारतीय वैज्ञानिक आणि संस्थांनी देखील कोविड-१९ रोगासंबंधी संशोधनासाठी तत्परतेने पुढाकार घेतला. दुर्दैवाने आताचे राजकीय नेतृत्व मात्र अशास्त्रीय गोष्टींना थारा देणे, त्यांचा जाणीवपूर्वक प्रसार करणे यातच मश्गूल आहेत. याउलट नेहरूंनी लोकशाही मूल्ये बळकट करतानाच प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक भारताचा पाया रचला.

loading image
go to top