New Delhi : राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

New Delhi : राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : अरूणाचल प्रदेशातील तवांग भागात चिनी सैन्याबरोबर झालेल्या सशस्त्र झटापटीनंतर भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना त्यांच्या निर्धारित जागेपर्यंत मागे ढकलले. या झटापटीत भारताचे एकही सैनिक मरण पावला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत सांगितले. मात्र यावर राज्यसभेच्या परंपरेप्रमाणे स्पष्टीकरणे किंवा शंका विचारण्यास विरोधी पक्षांना सरकारने संधी न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षसदस्यांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले.

दरम्यान चीनकडून राजीव गांधी फौंडेशन ला मिळालेल्या देणग्यांच्या मुद्यावर मात्र काँग्रेस बचावाच्या पवित्र्यात गेल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसने चीनकडून देणग्या घेतल्या त्यांना या मुद्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की राजनाथसिंह त्यांचे वक्तव्य वाचून सभागृहाबाहेर गेले. ते कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा चर्चेला तयार नव्हते. त्या प्रकरणाचा (राजीव गांधी फाऊंडेशनचा एफसीआरए परवाना रद्द करण्याच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. आमची चूक असेल तर आम्हाला फाशी द्या, असेही खर्गे संतप्तपणे म्हणाले.

राज्यसभेत आज सुरवातीपासूनच चीनशी झालेल्या चकमकीच्या मुद्यावरून वातावरण गरम होते. काँग्रेसने यावर चर्चेसाठी कामकाज रोखून धरले तेव्हा सुरवातीला यावर राजनाथसिंह दुपारी २ वाजता निवेदन करतील असे सांगितले गेले. त्यानंतर सरकारनेच कामकाज पत्रिकेत दुरूस्ती करून निवेदनाची वेळ दुपारी १२.३० अशी असेल असे जाहीर केले. मात्र त्यानंतरही गोंधळ न थांबल्याने शून्य प्रहरातील काही मुद्दे मांडल्यावर कामकाज स्थगित करण्यात आले.

दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाले तेव्हाही विरोधकांनी, आधी चर्चा मग निवेदन अशी मागणी केली ती सरकारने फेटाळली. त्यावर काँग्रेस खासदारांनी पुन्हा वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केली. जेव्हापासून हे (मोदी) सरकार देशात सत्तेवर आले आहे तेव्हापासून चीन फिरतफिरत आल्यासारखा भारतीय हद्दीत घुसतो व आमच्या सैन्यावर हल्ला करून निघून जातो आणि पंतप्रधान व हे सरकार मूग गिळून शांत रहाते, असा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला.

दरम्यान मंत्र्यांच्या निवेदनावर चर्चा न करण्याचे प्रसंग राज्यसभेत यापूर्वीही आले आहेत, असे स्पष्टीकरण उपाध्यक्ष हरिवंश यांनी दिले. ते म्हणाले की २००७ ते २०११ या काळात मुंबई दहशतवादी हल्ला, नक्षलवादी हल्ला, उत्तर प्रदेशातील साखळी बाम्बस्फोट, श्रीलंका परिस्थिती या घटनांवेळी राज्यसभेत मंत्र्यांच्या निवेदनानंतर स्पष्टीकरण विचारली गेली नव्हती व त्यावेळी चर्चाही झाली नव्हती. तीच परंपरा यावेलीही चालू राहील असे हरिवंश यांनी स्पष्ट केले. त्यावर संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर राज्यसभेच्या प्रवेशद्वारा बाहेर खर्गे यांच्यासह विरोधी सदस्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.