राष्ट्रपतींची शपथ आणि 'जय श्रीराम'च्या घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, एच. डी. देवेगौडा, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपचे अध्यक्ष अमित शहा होते. अमित शहा यांच्या अगदी मागे दुसऱ्या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते; परंतु चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश) आणि नितीशकुमार (बिहार) हे दोनच मुख्यमंत्री पहिल्या रांगेत होते. पहिल्या रांगेत नितीशकुमार यांच्याशेजारी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विरोधकांच्या उमेदवार राहिलेल्या मीराकुमार यांना स्थान देण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद याही पहिल्या रांगेतच स्थानापन्न झाल्या होत्या. कोविंद यांचे अन्य कुटुंबीयही या सोहळ्यासाठी आले होते.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील "एनडीए'चे उमेदवार वेंकय्या नायडूही पहिल्याच रांगेत होते. शेजारी असलेल्या सोनिया गांधींशी त्यांच्या दीर्घकाळ गप्पा सुरू होत्या. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचाही सोनिया गांधींशी संवाद रंगला. राहुल गांधी मात्र सभागृहाच्या मागील भागात कॉंग्रेस खासदारांसमवेत बसले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वांत शेवटच्या रांगेत तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांसोबत जाऊन बसल्या. रामनाथ कोविंद यांच्या या शपथविधी कार्यक्रमाला संघाचे पदाधिकारी सुरेश सोनीही केंद्रीय कक्षात हजर होते.

शपथविधीसाठी मावळते आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती संसदेच्या केंद्रीय कक्षात आल्यानंतर राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर "भारत माता की जय' अशा घोषणा काहींनी दिल्या. त्या क्षीण होत्या; परंतु शपथविधी झाल्यानंतर काही उत्साही खासदारांनी "भारत माता की जय'चा जयघोष केला. शिवाय, "जय श्रीराम'च्या घोषणाही दिल्या. प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींनी सर्वांशी हस्तांदोलन करणे शिष्टाचारसंमत मानले जात नाही; परंतु हा शिष्टाचार बाजूला ठेवत राष्ट्रपती कोविंद यांनी शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्या रांगेत असलेल्या सर्व मान्यवरांच्या आसनाजवळ जाऊन हस्तांदोलन केले आणि अभिनंदन स्वीकारले. नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, तसेच डॉ. मनमोहनसिंग, एच. डी. देवेगौडा यांच्यासह नितीशकुमार आणि इतरांशी हस्तांदोलन केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना नमस्कार केला. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्याशी हस्तांदोलन करताना राष्ट्रपती कोविंद यांनी कमरेत झुकून अभिवादनही केले.

ममता-मोदी भेटीने लक्ष वेधले
शपथविधी सोहळा संपल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये भेटीगाठींचा स्वतंत्र कार्यक्रम रंगला. पंतप्रधान मोदींना अनेक मुख्यमंत्री जाऊन भेटले, तर बाहेर पडताना ममता बॅनर्जीही मोदींना भेटल्या. पश्‍चिम बंगालमधील जातीय हिंसाचार, केंद्रीय तपास यंत्रणांची तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवरील कारवाई, सत्ताधारी भाजपशी सुरू असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर ममता-मोदी भेट उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. दोन्हीही नेत्यांची काही मिनिटे चर्चा झाली. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोवतीही भाजपच्या खासदारांचा गराडा दिसून आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news ramnath kovind President's oath