esakal | 'निर्भया'ला मिळाला न्याय; जाणून घ्या आठ वर्षांत कधी काय घडलं!
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi-Nirbhaya_Case

दोषींनी कायद्याची लढाई लढत फाशीला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कृत्याची त्यांना शिक्षा मिळाली आणि निर्भयाला न्याय मिळाला.

'निर्भया'ला मिळाला न्याय; जाणून घ्या आठ वर्षांत कधी काय घडलं!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Nirbhaya Case : दिल्ली दक्षिण भागात 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडली. या घटनेतील अल्पवयीन मुलावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर अल्पवयीन न्याय मंडळाने त्याला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी कायद्याची लढाई लढत फाशीला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कृत्याची त्यांना शिक्षा मिळाली आणि निर्भयाला न्याय मिळाला. देशाला हादरवणाऱ्या या प्रसंगाचा घटनाक्रम 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

2012 

 • 16 डिसेंबर 2012 - दक्षिण दिल्लीतील धावत्या बसमध्ये फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या तेवीस वर्षीय तरुणीवर अल्पवयीन मुलासह सहा जणांकडून बलात्कार. तिला तिच्या मित्रासह बसबाहेर फेकून देण्यात आले. त्यांना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले 
 • 17 डिसेंबर - पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपी बसचालक रामसिंग, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांची नावे निश्‍चित केली 
 • 18 डिसेंबर - रामसिंगसह इतर तीन संशयितांना अटक. या घटनेच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर. मध्य दिल्लीत जमाव आणि पोलिस यांच्यात चकमक 
 • 19 डिसेंबर - दोन आरोपींना दिल्ली न्यायालयात आणले, आरोपी विनयने आपल्याला फाशी द्यावी, अशी न्यायालयाकडे मागणी केली 
 • 21 डिसेंबर - पूर्व दिल्लीतील आनंद विहार भागातून पाचवा संशयित पकडला, त्याने आपण साडेसतरा वयाचा अल्पवयीन मुलगा असल्याचा दावा केला. आणखी एक आरोपी अक्षय कुमार सिंग याला बिहारात अटक 
 • 22 डिसेंबर - उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर पीडित तरुणीचा जबाब नोंदविला 
 • 23 डिसेंबर - दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी जलद गती न्यायालय स्थापले. निदर्शकांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केले, गंभीर जखमी अवस्थेत कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांना रुग्णालयात नेले 
 • 24 डिसेंबर - बलात्काराच्या घटनेतील गुन्हेगारांना कडक शासन करण्यासाठी आणि त्यांच्यावरील खटले लवकर निकाली निघण्यासाठी कायद्यात दुरुस्त्या करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमल्याची सरकारतर्फे घोषणा 
 • 25 डिसेंबर - कॉन्स्टेबल तोमर यांचे उपचार सुरू असताना रुग्णालयात निधन 
 • 27 डिसेंबर - पीडित तरुणीला पुढील उपचारासाठी सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात नेण्यात आले 
 • 29 डिसेंबर - पीडित तरुणीचा उपचार सुरू असताना सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू 
 • 30 डिसेंबर - पीडितेचा मृतदेह दिल्लीत आणला आणि तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार 

निर्भयाशी संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2013 

 • 3 जानेवारी 2013 - या घटनेतील पाचही संशयितांवर बलात्कार, खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे आणि खुनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले 
 • 7 जानेवारी - न्यायालयाचा इन कॅमेरा सुनावणीचा निर्णय 
 • 10 जानेवारी - पाचही संशयित आरोपींना बचावासाठी वकील मिळाले 
 • 28 जानेवारी - बालगुन्हेगारीविषयक न्याय मंडळाकडून (ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड) सहा आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याचे जाहीर 
 • 2 फेब्रुवारी - जलद गती न्यायालयाने सुनावणीचा मार्ग मोकळा केला, पाच जणांवर खून, सामूहिक बलात्कार आणि इतर आरोप ठेवण्यात आले 
 • 3 फेब्रुवारी - फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक 2013 ला 19 मार्च रोजी लोकसभेत आणि 21 मार्च रोजी राज्यसभेत मान्यता 
 • 5 फेब्रुवारी - सुनावणी सुरू, न्यायालयाने आरोपींचे जबाब नोंदवून घेतले 
 • 11 मार्च - आरोपी रामसिंग याने तिहार तुरुंगात त्याच्या कोठडीत फाशी घेतल्याचे आढळले 
 • 17 मे - पीडित तरुणीची आई साक्षीदार म्हणून न्यायालयात आली आणि तिने लेकीला न्याय मिळावा, अशी मागणी केली 
 • 14 जून - अल्पवयीन गुन्हेगार 18 वर्षांचा झाला, त्याचे वय शाळेच्या दाखल्यावरून निश्‍चित केले होते 
 • 11 जुलै - बालगुन्हेगारीविषयक न्याय मंडळाकडून अल्पवयीन गुन्हेगारावरील निकाल 25 जुलैपर्यंत लांबणीवर 
 • 22 ऑगस्ट - भाजपचे नेते सुब्रहमण्यम स्वामी यांची "अल्पवयीन' या शब्दाचा नव्याने अर्थ लावण्याची विनंती मान्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची बालगुन्हेगारीविषयक न्याय मंडळाला निकाल देण्यास अनुमती 
 • 31 ऑगस्ट - बालगुन्हेगारीविषयक न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला खास सुधारगृहात तीन वर्षे राहण्याची शिक्षा दिली 
 • 10 सप्टेंबर - जलद गती न्यायालयाने चौघा आरोपींवरील तेरा गुन्हे सिद्ध झाल्याचे नमूद करून त्यांना दोषी ठरवले 
 • 13 सप्टेंबर - जलद गती न्यायालयाने चौघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली 

2014 

 • 13 मार्च - चारही संशयीत आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब. 

2015 

 • 20 डिसेंबर - अल्पवयीनाच्या सुटकेला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. 

निर्भयाशी संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2016 

 • 3 एप्रिल - सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. 

2017 

 • 27 मार्च - वर्षभर सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. 
 • 5 मे - निर्भया प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेशसिंग यांच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब. 

2018 

 • 9 जुलै - पवन, मुकेश आणि विनय यांनी दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळली. 
 • 13 डिसेंबर - निर्भयाच्या पालकांची पतियाळा न्यायालयात धाव घेत फाशीच्या शिक्षेच्या कार्यवाहीची मागणी 

निर्भयाशी संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2019 

 • 29 ऑक्‍टोबर 2019 - तिहार तुरुंगाच्या प्रशासनाने चारही आरोपींनी दयेचा अर्ज करायचा असल्यास सात दिवसांत करा, अन्यथा न्यायालयात जाऊन फाशीच्या कार्यवाहीसाठी ब्लॅक वॉरंट काढण्याची मागणी करू, असे सांगितले. 
 • 8 नोव्हेंबर - दिल्ली सरकारकडे विनयचा दयेचा अर्ज. 
 • 29 नोव्हेंबर - दिल्ली सरकारने विनय अर्ज फेटाळला आणि त्याची फाईल मुख्य सचिवांकडे पाठवली. 
 • 30 नोव्हेंबर - मुख्य सचिवांनी अर्ज फेटाळला आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे पाठवला. 
 • 1 डिसेंबर - जैन यांनी अर्ज फेटाळून लावत नायब राज्यपालांकडे पाठवला. 
 • 2 डिसेंबर - नायब राज्यपालांनी विनयचा अर्ज फेटाळतानाच, तो दिल्ली सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला. 
 • 6 डिसेंबर - दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे रवाना, दिल्ली सरकारने दयेस नकार दिला. 
 • 17 डिसेंबर - फेरविचार याचिकेच्या सुनावणीतून सरन्यायाधिशांची माघार. 

2020 

 • 7 जानेवारी 2020 - निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात फाशी देण्याची वेळ निश्‍चित. 
 • 8 जानेवारी - तिहार तुरुंगात 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींना फासावर लटकवण्यात यावे, अशा आशयाचे डेथ वॉरंट दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने जारी केले. 
 • 14 जानेवारी - मुकेश कुमार आणि विनय शर्मा या आरोपींनी सादर केलेली क्‍युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपिठाने फेटाळून लावली. 
 • 17 जानेवारी - मुकेशकुमार याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावला. 
 • 28 जानेवारी - आरोपी अक्षयकुमारने सर्वोच्च न्यायालयात क्‍युरेटिव्ह पिटीशन दाखल केली. 
 • 30 जानेवारी - अक्षयकुमारची क्‍युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. 
 • 31 जानेवारी - विनय शर्मा आणि अक्षयकुमार यांचे दयेचे अर्ज प्रलंबित असल्याने दिल्लीतील न्यायालयाने डेथ वॉरंट निलंबित केले. 
 • 1 फेब्रुवारी - विनय शर्माचा दयेचा अर्ज राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळून लावला. 
 • 5 फेब्रुवारी - आठवडाभरात तुम्हांला उपलब्ध असलेल्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करून मोकळे व्हा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींना सुनावले. दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना फाशी द्यावी, अशा दिलेल्या आदेशाविरोधात केंद्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 
 • 11 फेब्रुवारी - केंद्राने फाशीची तारीख निश्‍चित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. 
 • 14 फेब्रुवारी - विनय शर्माचा दयेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. 
 • 17 फेब्रुवारी - 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता आरोपींना फाशी देण्यात यावी, अशा आशयाचे नव्याने डेथ वॉरंट जारी. 
 • 2 मार्च - खंडपीठाने पवन गुप्ताची क्‍युरेटिव्ह पिटीशन फेटाळून लावली. मृत्युदंडाऐवजी आपल्याला आजन्म कारावासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी यात केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे तो दयेचा अर्ज करू शकतो, असेही स्पष्ट झाले. 
 • 5 मार्च - दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीची 20 मार्च रोजी पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी कार्यवाही करावी, अशी सूचना देणारे डेथ वॉरंट जारी केले. मुकेशकुमार सिंग (वय 32), पवन (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) यांच्या कायदेशीर लढाईमुळे तीनदा त्यांची फाशी लांबणीवर पडली होती. 
 • 19 मार्च - आरोपींचे सर्व पळवाटा संपल्या, फाशी अटळ 
 • 20 मार्च - निर्भयाच्या मारेकऱ्यांना पहाटे साडेपाच वाजता फाशी 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

निर्भयाशी संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top