महिन्यापूर्वी बांधलेला पूल गेला वाहून; विरोधकांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

कार्तिक पुजारी
Thursday, 16 July 2020

एक महिन्यापूर्वी लोकांसाठी खुला करण्यात आलेला बिहारमधील एक पूल जोरदार पावसामुळे कोसळला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच या पुलाचे उद्घाटन केले होते.

पाटणा- एक महिन्यापूर्वी लोकांसाठी खुला करण्यात आलेला बिहारमधील एक पूल जोरदार पावसामुळे कोसळला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच या पुलाचे उद्घाटन केले होते. या पुलावरुन बिहारमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एक महिन्यापूर्वी उद्घाटन झालेला पूल पडल्याने विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजस्थान काँग्रेसमधला वाद पोहोचला कोर्टात; विशेष बेंच देणार निर्णय
सत्तरघाट पूल गोपालगंजमधील गंडक नदीवर आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते  मदन मोहन झा यांनी घटनेचे छायाचित्र ट्विट करुन नितीश कुमार यांना धारेवर धरले आहे. एकदम नवीन असलेला सत्तरघाट पूल पडला. एका महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी याचे उद्घाटन केले होते. या पुलावर 263 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर बिहार सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधक खोटी बातमी देत असल्याचा दावा सरकारने केला आहे. पूलापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला रस्ता खराब झाला आहे. मात्र, या रोडचा सत्तरघाट पूलाशी काही संबंध नाही. पूल एकदम सुरक्षित आहे, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटमध्ये म्हणण्यात आलं आहे. लिंक रोड कशामुळे पडला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं  राज्यमंत्री नंद किशोर यादव म्हणाले आहेत. 

माहितीनुसार, पूलला जोडणारे रस्ते पाण्याच्या जोराच्या दबावाला सहन करु शकले नाहीत. बिहारमध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पूलाच्या परिसरातील रस्ते पाण्याखाली केले आहेत. सरकारी अधिकारी आणि अभियंत्यांचा गट घटना स्थळी पोहोचला असून नुकसानीची पाहणी करत आहे.

मेळघाटातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला मुख्यमंत्र्यांचाच विरोध, वाघांच्या...
दरम्यान, 16 जून रोजी नितीश कुमार यांनी सत्तरघाट पूलाचे उद्घाटन केले होते. या पुलासाठी एकूण 263 कोटी रुपये खर्च आला होता. विरोधी पक्षांनी या मुद्दावरुन नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. पूल वाहून जाणे हे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये नेहमीचं झालं आहे. बिहार सरकारने तात्काळ पूल बनवलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे. या पूल बांधणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत. बिहार काँग्रेस प्रमुख मदन मोहन झा यांनीही नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पूल 263.47 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला. 16 जूनला याचे उद्घाटन झाले. 15 जूलै रोजी हा पूल वाहून गेला. आता यासाठी उंदरांना दोषी ठरवू नका, असा टोला मदन झा यांनी लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newly constructed Sattarghat bridge over River Gandak was washed away