गडकरी म्हणाले, शिवसेनेसोबत साऱ्याच मुद्दयांवर एकमत नसले तरी...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

दिल्लीत निवडक पत्रकारांशी अनौपचारीक वार्तालापात गडकरी यांनी 'स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भाजपच्या दृष्टीने संपलेला नाही,' असेही स्पष्ट केले. आर्थिक मंदीच्या वातावरणातून भारत निश्‍चितपणे मार्ग काढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दिल्लीत निवडक पत्रकारांशी अनौपचारीक वार्तालापात गडकरी यांनी 'स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भाजपच्या दृष्टीने संपलेला नाही,' असेही स्पष्ट केले. आर्थिक मंदीच्या वातावरणातून भारत निश्‍चितपणे मार्ग काढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

कलम 370 रद्द करण्याचा कायदा भाजपने राजकीय लाभाचा विचार करून मंजूर केलेला नसून तो पक्षाच्या विचारचिंतनाचा भाग आहे. मी अध्यक्ष होण्यापूर्वी, अध्यक्ष झालो तेव्हा आणि नंतरच्या अध्यक्षांच्या काळातही हे कलम रद्द करणे काश्‍मीरच्या व देशाच्या हिताचेच आहे, हाच मुद्दा भाजपने मांडला होता, असेही गडकरी यांनी सांगितले. भाजप सरकारने हा कायदा राजकारणाचा हिशोब न पाहता मंजूर केला, असे त्यांनी सांगितले. 

नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे. या विमानतळाचे काम मुंबई विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे, असे मी संबंधित ठेकेदाराला बजावल्याचे सांगून गडकरी म्हणाले की सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या मार्फत कोट्यवधी तरूणांना रोजगार मिळवून देण्याच्या योजना वेगाने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 

गडकरी यांनी सांगितले की, नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळ हटविता येऊ शकतो. गोदावरीतून समुद्रात वाहून जाणारे पाणी धरण बांधून अडवले, तर नाशिक, मराठवाडा व नगर जिल्ह्यांचा विकास होईल. गोदावरीवरील धरणे व जलाशय पुरेसा पाऊस नसला तरी भरून जातील. त्यामुळे असे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने महाराष्ट्रात 107 पूल व जलाशयांच्या कामांना गती दिली आहे. जलाशय व बंधाऱ्यांतील गाळ काढून तो रस्त्यांच्या कामात वापरण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. देशपातळीवर नदीजोड प्रकल्प व जलमार्ग यांचा विकास हातात हात घालून होणे गरजेचे आहे. वाराणसी-पश्‍चिम बंगाल जलमार्गातून वाहतूक सुरू झाली असून अशी योजना नेपाळच्या सीमेपर्यंत मी मंत्री असताना आखली होती. 

अमित शहा - नाना पाटेकर भेटीबाबत...
अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच दिल्लीवारी करून भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर पाटेकर हे भाजपमध्ये सामील होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, "नानांची राजकारणात येण्याची इच्छा नाही,'' असे स्पष्ट निरीक्षण गडकरी यांनी नोंदवले. ते म्हणाले की, 'नाम' फाउंडेशनला येणाऱ्या देणग्या व कराबाबतच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी नाना दिल्लीत आले होते. 'मला कोणत्याही फॉर्मवर सह्या करायला सांगू नका,' असे सांगून त्यांनी त्यांची राजकारणाबाबतची अनिच्छा व्यक्त केल्याचेही गडकरी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari comment on the alliance of BJP and Shiv Sena