
कमी जागा मिळूनही नितीशकुमार मुख्यमंत्रिपद स्वीकारणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले तर त्यांना भाजपच्या कृपेने हे पद मिळाल्याचे मानले जाईल.
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता एक दिवस उलटला तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या या मौनाची येथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आपल्या पक्षाला कमी जागा मिळण्यास ते लोक जनशक्ती पक्ष (लोजप) जबाबदार असल्याचे मानत आहेत. याचा वचपा काढण्यासाठी लोजपला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा त्यांचा विचार आहे. अर्थात, नितीशकुमार हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) मुख्यमंत्री असतील, असे भाजपने वारंवार स्पष्ट केले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लोजपने ही निवडणूक केवळ नितीशकुमार यांच्याविरोधातच लढल्याने जेडीयूच्या २७ जागा घटल्या. जेडीयूचे उमेदवार पडण्यामागे लोजपच कारणीभूत ठरली. निकालानंतरही लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांच्या मनातील कटुता गेली नसून, नितीश यांनी मुख्यमंत्री बनू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या निवडणुकीतील ७१ जागांवरून यंदा जेडीयूच्या जागा ४३ पर्यंत खाली आल्या आहेत. जेडीयूच्या जागा कमी करण्यात जसा लोजपचा वाटा होता, तसाच वाटा सीमांचल भागात महाआघाडीच्या जागा कमी करण्यात ‘एमआयएम’चा आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या या पक्षाने पाच जागांवर विजय मिळविला. बिहारमध्ये प्रथमच ओवेसी यांच्या पक्षाने अस्तित्व दाखवून दिले आहे. उपेंद्र कुशवाहा आणि पप्पू यादव यांनीही महाआघाडीच्या जागा कमी करण्यात आपापला वाटा उचलला. अशा काही शक्तींनी भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम केल्याची प्रतिक्रिया राजद नेते तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नितीश यांच्या भूमिकेकडे लक्ष
कमी जागा मिळूनही नितीशकुमार मुख्यमंत्रिपद स्वीकारणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले तर त्यांना भाजपच्या कृपेने हे पद मिळाल्याचे मानले जाईल. हे नितीशकुमार यांच्यासाठी अवमानजनक आहे. कदाचित अशी परिस्थिती असल्यानेच त्यांनी अद्यापपर्यंत मौन बाळगले आहे. भाजपकडून आपल्याला कामकाजात ‘फ्रि हँड’ मिळावा, हस्तक्षेप होऊ नये, अशी नितीश यांची अपेक्षा असल्याचे समजते.
छोटा भाऊ झाला मोठा
बिहारच्या राजकारणात भाजप आतापर्यंत जेडीयूच्या छोट्या भावाच्या रुपात वावरत होता. आता मात्र भाजपला ७४ जागा मिळाल्या असून ‘एनडीए’तील हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सरकारमधील वाट्यासह इतर अनेक गोष्टीत आपली भूमिका अधिक मोलाची ठरावी, अशी त्यांची अपेक्षा असणारच. वरवर पाहता भाजपने जरी नितीश यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शविली असली तरी, नितीश यांनीच या पदाची सूत्रे भाजपकडे द्यायला हवी, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. नितीश यांनी केंद्रीय राजकारणात आता रस घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी केले आहे. मात्र, असे झाले तर बिहारमध्ये जेडीयूच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे आता नितीशकुमार काय धोरण स्वीकारतात आणि त्यांना कामकाजात स्वातंत्र्य देण्याची भाजप कितपत तयारी दर्शवितो, ते पहावे लागेल.