Bihar Politics : नितीश कुमार अस्वस्थ; उद्धव ठाकरेंची स्थिती, नड्डांच्या वक्तव्याने वाटू लागली भीती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar Latest News

नितीश कुमार अस्वस्थ; उद्धव ठाकरेंची स्थिती, नड्डांच्या वक्तव्याने वाटू लागली भीती!

Nitish Kumar Latest News पाटणा : बिहारच्या राजकारणात सुरू झालेल्या गदारोळाची तार महाराष्ट्राशी जुळू लागली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत जे घडले त्यामुळे नितीश कुमार (Nitish Kumar) अस्वस्थ झाले आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्या ‘प्रादेशिक पक्ष टिकणार नाहीत’ या वक्तव्याने जेडीयू अधिक सावध झाली आहे. त्यांनी हे वक्तव्य नुकतेच बिहारमध्ये केले होते. त्यामुळेच जेडीयूने आपले अस्तित्व वाचवण्यासाठी भाजपपासून दुरावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

प्रादेशिक पक्ष टिकणार नाहीत, असे जे. पी. नड्डा म्हणाले होते. परंतु, आमच्यासारखे प्रादेशिक पक्ष मित्रपक्षाच्या भूमिकेत आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते, असे जेडीयूचे ज्येष्ठ नेते उमेश कुशवाह म्हणाले. बिहारची अवस्था महाराष्ट्रासारखी होईल या भीतीने नितीश कुमार खूप घाबरल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

हेही वाचा: सरकारमध्ये मंत्रिपदासाठी विशेष अट; ‘या’ माजी मंत्र्याचा पत्ता कापला जाऊ शकतो

उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमार (Nitish Kumar) यांचाही प्रादेशिक पक्ष आहे. ते आपले अस्तित्व आणि सत्ता वाचवण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार पाडण्यात त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा मोठा वाटा आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी जवळीक साधून असा खेळ रचला की, आज मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पक्ष वाचवण्यासाठी लढा देत आहे.

उद्धव ठाकरेंप्रमाणेच (Uddhav Thackeray) नितीश कुमार यांचेही भाजपशी (BJP) दीर्घ आणि सखोल नाते आहे. फरक एवढाच आहे की, नितीश यांनी २०१७ मध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी मित्रपक्ष सोडले होते. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. बिहारमध्ये सुरू असलेल्या या खेळामागे अमित शाहांचा हात असल्याची भीती नितीशकुमार यांना वाटत आहे.

हेही वाचा: BJP State President : आशिष शेलार होणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष; सूत्रांची माहिती

नितीश कुमार यांना अमित शाहांवर शंका

शाहांनी जवळच्या मंत्र्यांना आपल्या सरकारमध्ये बसवले आहे, असे नितीश कुमार यांचे मत आहे. कालांतराने नितीश कुमार यांच्या मनात आरसीपी सिंगबद्दलही शंका निर्माण झाल्या आहे. २०२१ मध्ये नितीश यांनी जनता दल युनायटेडच्या वतीने आरसीपी सिंह यांचा केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश केला होता. नंतर बिहारमध्ये आरसीपी सिंग हे अमित शाह यांच्या जवळचे बनले. नितीश कुमार यांच्या पक्षात असतानाही त्यांनी त्यांच्याविरुद्ध विष ओकण्यास सुरुवात केली.