esakal | Bihar - नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

‘एनडीए’च्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर सोमवारी  नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेतली.

Bihar - नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विधीमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची रविवारी एकमुखाने निवड झाली. त्यानंतर शपथविधीचा सोहळा पार पडला. ‘एनडीए’च्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. नितीश कुमार यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 

याआधी रविवारी संरक्षण मंत्री व पर्यवेक्षक राजनाथसिंह, बिहारमधील भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ‘जेडीयू’, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम), विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी)आमदारांची बैठक घेऊन ‘एनडीए’च्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड केली. नितीश कुमार यांनी त्यानंतर राज्‍यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. ‘एनडीए’तील चारही घटक पक्षांकडून त्यांना समर्थनपत्र देण्यात आले. 

‘मुख्‍यमंत्री भाजपचा असावा’
बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाला (जेडीयू)४३ आणि भाजपला ७४ जागा मिळाल्या. ‘जेडीयू’ला कमी जागा मिळाल्याने नितीश कुमार यांनी ‘एनडीए’च्या बैठकीत भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी विनंती केली होती. ‘भाजपने सरकार स्थापन करावे. ‘जेडीयू’चे त्याला समर्थन असेल,’ असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. पण राजनाथसिंह यांच्यासह भाजप नेत्यांनी तो अमान्य करीत नेतेपदी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केले. भाजप आमदारांच्या गटाच्या नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची तर उपनेतेपदी रेणू देवी यांची निवड करण्यात आली. प्रसाद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सत्तेच्या नाड्या भाजपकडे?
जाणकारांच्या मते पुढील काही वर्षांत बिहारच्या राजकारणाची कमान स्वतःच्या हाती ठेवण्याच्या तयारीत भाजप आहे. सुशीलकुमार मोदी यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याची चाल हा त्याचाच एक भाग आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत आलेल्या भाजपने पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदी पक्षाचा नेत्याला विराजमान करण्याच्या दिशेने पावले उचलली तर नवल वाटायला नको.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुशीलकुमार मोदी केंद्रात येणार?
नितीश कुमार यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुशील कुमार यांना यंदा उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने पक्षाच्या गट नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड केल्याने तेच  उपमुख्यमंत्री होतील, असा अंदाज आहे. सुशील कुमार यांना केंद्रात एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मोदी यांना उपमुख्यमंत्री करू नये, असे पक्षातील त्यांच्या विरोधकांना वाटत आहे.