esakal | New Delhi : नितीश कुमारांचा पुन्हा भाजपविरोधी सूर
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

नितीश कुमारांचा पुन्हा भाजपविरोधी सूर

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार -सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा : बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा नव्याने केली आहे. यामुळे राज्यात भाजपशी युती करून सत्तेवर आलेला संयुक्त जनता दल(जेडीयू) पक्ष व नितीश कुमार यांनी नवा खेळ मांडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्‍याची मागणी आता करण्यात मुख्यमंत्र्यांचा काय हेतू असू शकतो, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. जेव्हा केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार होते, त्यावेळी याच मुद्दावरून नितीश कुमार यांचे काँग्रेसशी मतभेद झाले होते. आता ज्या आघाडीतील ते भागीदार आहे, ती राष्ट्रीय लोकशाही आघाडी केंद्रात सत्तेवर आहे. नितीश कुमार भाजपबरोबर असले तरी त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व ठेवू इच्छितात, असे जाणकारांचे मत आहे.

दोन दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांचे निकटचे मंत्री विजेंद्र प्रसाद यादव यांनी नीती आयोगावर टीका केली होती. बिहार सरकारने केलेल्या विविध कामांकडे नीती आयोगाने दुर्लक्ष केल्यानेच बिहारला कमी दर्जाची श्रेणी मिळाली, असा आरोप करीत विशेष राज्याची मागणी करून आम्ही थकलो आहोत, असे यादव म्हणाले होते. दुसरीकडे नितीश कुमार म्हणाले की, आम्ही विशेष राज्याच्या दर्जाची मागणी सोडलेली नाही. गरीब राज्यांना मदत करणे हे केंद्राचे काम आहे. जातीनिहाय जनगणनेवरील प्रश्‍नाला उत्तर देताना या मुद्यावर आम्ही सर्व पक्षांबरोबरील बैठकीनंतर घेऊन निर्णय घेऊ. जातीनिहाय जनगणना करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने कोर्टात नुकतेच स्पष्ट केले आहे.

भविष्यात स्वतंत्र मार्ग निवडण्याची नांदी

बिहारला विशेष राज्याची दर्जा आणि जातीनिहाय जनगणनेवर नितीश कुमार यांच्या भूमिकेने भापजमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेविरोधात बोलत आहेत. ‘एनडीए’तील दोन पक्षांचे दोन वेगवेगळ्या मुद्यांवरील मतांतरामुळे भविष्यात दोघांनी वेगवेगळ्या मार्ग निवडले तर आश्‍चर्य वाटायला नको.

loading image
go to top