केवळ खासदार आहात म्हणून कारवाईतून सूट नाही - नायडू

राज्यसभाध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी गदारोळ घालणाऱ्या राजकीय पक्षनेतृत्वांना समज दिली
No exemption from action just because you are an MP Naidu
No exemption from action just because you are an MP NaiduSakal

नवी दिल्ली - संसदेचे अधिवेशन चालू असताना संसद सदस्यांची कोणत्याही गैरप्रकारांच्या आरोपांवरून चौकशी किंवा त्यांना अटक होऊ शकत नाही हा निव्वळ गैरसमज असल्याचे सांगून राज्यसभाध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी या मुद्यावरून गदारोळ घालणाऱ्या राजकीय पक्षनेतृत्वांना समज दिली. प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) यंग इंडियान घोटाळ्यात गांधी मायलेकांसह विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आदी कॉंग्रेस नेत्यांची सुरू केलेली चौकशी अन्याय्य असल्याचे सांगून कॉंग्रेससह विरोधकांनी या मुद्यावर गदारोळ केला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रा चाळीच्या तथाकथित गैरव्यवहाराबद्दल ईडीने अटक केल्याचाही मुद्दा वरिष्ठ सदनात गाजला होता. या साऱ्या आक्षेपांना नायडू यांनी उत्तर दिले.

राज्यघटनेने कलम १०५ (२) नुसार संसद सदस्यांना विशेषाधिकार बहाल केले असल्याचे सांगताना नायडू यांनी विशेषाधिकार फक्त संसदीय पटलांवर असतात हे निदर्शनास आणून दिले. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल व राज्यसभाध्यक्षांनी दिलेले निर्णय यांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की संसद अधिवेशन चालू असताना खासदारांना नजरकैदेतून, अटकेपासून आणि तपास संस्थांनी प्रश्न विचारण्यापासून सूट मिळते, अशी सभागृहातील काही सदस्यांची चुकीची धारणा होती.

मी हे स्पष्ट करू शकतो की खासदार हेदेखील सामान्य माणसाप्रमाणेच आहेत, संसद सदनाने दिलेला विशेषाधिकार त्यांना फौजदारी कारवाईपासून सुटका मिळविण्यासाठीचा उपाय ठरू शकत नाही किंवा कारवाईतून त्यांना माफ करत नाही. संसदेत हजर रहायचे आहे (हाऊस ड्यूटी) हे कारण पुढे करून तपास संस्थांच्या चौकशीपासून आपला पवाद केला जावा असे म्हणणे घटनेनुसार चुकीचे आहे. त्यांना सदनाने दिलेले विशेषाधिकार त्यांना गुन्हेगारी आरोपांना उत्तर देण्यापासून रोखत नाहीत.

नेमक्या याच मुद्यांवरून खर्गे यांनी काल (गुरूवारी) सभागृहात संतप्त भावना व्यक्त केली होती. खर्गे यांना ईडीने काल समन्स बजावले व नंतर ८ तास त्यांची झाडाझडती घेतली. त्यापूर्वी खर्गे यांनी सांगितले होते की मला ईडीने संसद चालू असताना असे समन्स बजावणे हे योग्य आहे का?

तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी व अनिल देसाई यांनी रऊत यांना ईडीने अटक केल्याने घोषणाबाजी केली होती. राऊत हे खासदार आहेत व संसद अधिवेशन चालू असताना त्यांना अटक करणे कायद्याच्या विरूध्द आहे असा चतुर्वेदी यांचा युक्तिवाद होता. नायडू यांनी खासदारांना गुन्हेगारी खटल्यातून सूट मिळावी, या विरोधी पक्षांच्या भावनेशी असहमती दर्शविली. तेलगू देसमचे केशव राव यांनी त्यावर, न्यायालयाच्या निकालांतही विरोधाभास असल्याचे सांगितल्यावर नायडू यांनी त्यांना पुढे बोलण्यास परवानगीनाकारली व ही चर्चा नाही असे सांगितले.

राऊत - रडायचं नाही लढायचं !

ईडी कारवाईच्या विरोधातील आपल्या लढाईला राज्यसभेतील विरोधी पक्षांनी सथ देऊन आपल्या मागे ते ठामपणे उभे राहिल्याबद्दल संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे विरोधकांचे आभार मानले आहेत. त्यांनी खर्गे यांना याबाबत पत्र लिहीले आहे. आपल्या लेटरहेडवर लिहीलेल्या या पत्रात खासदार राऊत यांनी, ‘ रडायचं नाही लढायचं‘ अशी भावना व्यक्त केली आहे. ईडीच्या सूडबुध्दीने सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात आपली लढाई चालू राहील असेही त्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com