esakal | काश्मीरमध्ये दूरध्वनी बंद राहिल्याने शेकडोंचे वाचले प्राण - सत्यपाल मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

काश्मीरमध्ये दूरध्वनी बंद राहिल्याने शेकडोंचे वाचले प्राण - सत्यपाल मलिक

- नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा 

काश्मीरमध्ये दूरध्वनी बंद राहिल्याने शेकडोंचे वाचले प्राण - सत्यपाल मलिक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यातील सद्यःस्थितीवर भाष्य करताना नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सध्या राज्यामध्ये औषधे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नसून सरकारने दूरध्वनी सेवेवर निर्बंध घातल्यानेच शेकडो लोकांचे प्राण वाचल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्यात आल्यानंतरच्या दहा दिवसांमध्ये कुठलाही हिंसाचार झाला नाही, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

"दूरध्वनी यंत्रणा बंद केल्याने शेकडो लोकांचे प्राण वाचणार असतील, तर यामध्ये चुकीचे काय आहे,'' असा सवालही त्यांनी या वेळी केला. याआधी काश्‍मीरमध्ये संघर्ष झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये किमान पन्नास लोक तरी मरत होते. या खेपेस सगळ्या राड्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणूनच आम्ही प्रयत्नशील होतो. दहा दिवस दूरध्वनी सेवा बंद झाली म्हणून काय झाले? आम्ही लवकरच सर्व काही पूवर्वत करू, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. दरम्यान, राज्यातील परिस्थितीमध्ये आज पुन्हा सुधारणा झाल्याने काश्‍मीर खोऱ्यातील काही भागांतील दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यात आली होती. 

सरकारने यंदा काश्‍मीर खोऱ्यातील नागरिकांना थेट घरपोच सेवा दिली, ईदनिमित्त मांस, भाज्या आणि अंडी आणि फळांचा त्यांना पुरवठा करण्यात आला होता. - सत्यपाल मलिक, नायब राज्यपाल, जम्मू-काश्‍मीर 

राहुल गांधी यांना पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जम्मू-काश्‍मीरला भेट द्यायची असेल, तर आम्ही तशा सुविधा त्यांना दिल्या जाव्यात, अशी विनंती पर्यटन विभागाकडे करू. राज्यातील संवदेनशील स्थिती लक्षात घेऊनच विरोधकांना दिल्लीला परत पाठविण्यात आले होते. प्रशासनाचा निर्णय योग्यच होता. - संजय राऊत, शिवसेना नेते 

loading image
go to top