‘नागरिकत्व’, ‘३७०’बाबत फेरविचार नाही

पीटीआय
Monday, 17 February 2020

नागरिकत्व कायदा आणि कलम- ३७०बाबत फेरविचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे सरकार याआधीही या निर्णयांवर ठाम होते आणि भविष्यामध्येही ते तसे राहील, असा निर्धार व्यक्त केला.

वाराणसी - नागरिकत्व कायदा आणि कलम- ३७०बाबत फेरविचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे सरकार याआधीही या निर्णयांवर ठाम होते आणि भविष्यामध्येही ते तसे राहील, असा निर्धार व्यक्त केला. सर्व बाजूंनी दबाव येऊनदेखील केवळ राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातूनच हे निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी आज येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जम्मू काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम असो किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा, देश मागील अनेक वर्षांपासून त्याची वाट पाहत होता. राष्ट्रहितासाठी असे निर्णय घेणे गरजेचे होते. जगभरातून या संदर्भात आमच्यावर दबाव येत असतानाही आम्ही त्यावर पूर्वीही ठाम होतो आणि भविष्यातदेखील ठाम राहू, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असतानाच मोदी यांनी वाराणसीमध्ये केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

ट्रस्टला मिळणार जमीन
अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीचा उल्लेख करताना ते म्हणाले की ‘‘यासाठी आम्ही वेगळ्या ट्रस्टची स्थापना केली असून, हे विश्‍वस्त मंडळ वेगाने काम करेल. ट्रस्टच्या उभारणीनंतर रामधामच्या उभारणीलाही वेग येईल. मंदिराच्या उभारणीसाठी अधिग्रहीत करण्यात आलेली ६७ एकर जमीन ही ट्रस्टकडे सोपविली जाणार असून, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट हे मंदिराच्या उभारणीचे काम पाहील.’’

श्री जगद्गुरू विश्‍वाराध्य गुरुकुलच्या शताब्दी सांगता सोहळ्यामध्ये बोलताना मोदींनी उपरोक्त घोषणा केली.

मोदी म्हणाले
    वाराणसीत २५ हजार कोटींची कामे सुरू
    रस्ते, महामार्ग आणि रेल्वेमार्गांना प्राधान्य
    पूर्वांचल एक्स्प्रेसवेच्या कामाला वेग
    वारसास्थळे- तीर्थक्षेत्रांना जोडण्यास सरकारचे प्राधान्य
    लोकांच्या मूल्यावर देशाची जडणघडण होते
    दीनदयाळ यांच्या अंत्योदयाचे सरकारकडून अनुकरण

विकासकामांचा श्रीगणेशा
    काशी महाकाल एक्स्प्रेस (वाराणसी ते इंदूर)
     गाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरवात
    जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या 
६३ फुटी पुतळ्याचे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन
    वाराणसीतील बाराशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
    शैव पंथीयांच्या जंगमवाडी मठासही मोदींची भेट
    पंतप्रधानांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शनाचेही उद्‌घाटन
    ४३० खाटांची सोय असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No reconsideration About Citizenship Act and Section 370