काश्‍मीरबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा नाहीच

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 20 September 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची नेमकी भूमिका काय असेल, हे स्पष्ट करतील. या दौऱ्यात जम्मू-काश्‍मीरच्या 370 व्या कलमावर कोणतीही चर्चा होणार नाही.

नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा 21 सप्टेंबरपासून
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची नेमकी भूमिका काय असेल, हे स्पष्ट करतील. या दौऱ्यात जम्मू-काश्‍मीरच्या 370 व्या कलमावर कोणतीही चर्चा होणार नाही.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज पत्रकार परिषदेत मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याची माहिती दिली. बहुपक्षीय चर्चा, द्विपक्षीय चर्चा, उद्योजकांशी तसेच अनिवासी भारतीयांशी संवाद आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये सहभाग असा दौऱ्याचा कार्यक्रम असेल. मोदी ह्यूस्टन आणि न्यूयॉर्क या दोन शहरांमध्ये जातील. 22 सप्टेंबरला मोदी "हाउडी मोदी' या कार्यक्रमात सुमारे 50 हजार अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचे अन्य नेतेही यात सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे कोणत्याही देशाच्या प्रमुखांसमवेत सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल, असे ते म्हणाले.

या दौऱ्यादरम्यान, द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय चर्चेत 370 व्या कलमावर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थीसाठी ट्रम्प यांनी जाहीरपणे तयारी दर्शविली असली तरी मोदींनी काश्‍मीरच्या मुद्द्यावरील भारताची भूमिका ट्रम्प यांच्यासमोरच स्पष्ट केली असून ती परिपूर्ण आहे. यामध्ये मध्यस्थीचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, असे विजय गोखले यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी विकास, पर्यावरण बदलासह अनेक द्विपक्षीय, बहुपक्षीय विषय आहेत, त्यात दहशतवाद हाही मुद्दा आहे. परंतु तेवढ्यावरच भर नसेल, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका काय असेल यावर पंतप्रधान बोलतील, असेही गोखले यांनी सांगितले.

मोदी 21 तारखेला दुपारी अमेरिकेला रवाना होतील. ह्यूस्टनमध्ये गोलमेज परिषदेला ऊर्जा क्षेत्रातील बड्या कंपन्यांशी चर्चा करतील. 24 सप्टेंबरला आमसभेत महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती कार्यक्रमाची घोषणा करतील. "नेतृत्व आणि सांप्रतकाळी गांधीजींची प्रासंगिकता' अशी या कार्यक्रमाची संकल्पना असेल. यात अन्य देशांचे प्रमुखही सहभागी होणार आहेत. या दरम्यानच संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या छतावर गांधी सोलर पार्कचे उद्‌घाटन होईल. अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि सौरऊर्जेच्या वापरासाठी भारताची कटिबद्धता दर्शविण्यासाठी हे सोलर पार्क असेल.

'ग्लोबल गोलकिपर' पुरस्कार
याखेरीज चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनतर्फे दिला जाणारा "ग्लोबल गोलकिपर' पुरस्कार या वर्षी पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मोदींनी स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No talks with Trump about Kashmir Narendra Modi