
कोरोना नियमांचे वारंवार उल्लंघन होत असेल तर प्रचारसभांवर बंदी घालण्याचेही अधिकार आयोगाला आहेत अशी आठवण माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी करवून दिली आहे.
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये उमेदवार व पक्षांकडून कोरोना आरोग्य नियमांची ऐशीतैशी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने, नवीन आरोग्य दिशानिर्देश जारी केले आहेत. नियम न पाळल्यास संबंधित उमेदवाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, निवडणुकीच्या किंवा सणाच्या अशा कोणत्याही निमित्ताने कोरोना नियमांचे उल्लंघन महागात जाऊ शकते, हे केरळमधील ओणम सणाच्या उदाहरणावरून दिसल्याने केंद्राच्या पातळीवरूनही चिंता व्यक्त होते. आता निवडणूक आयोगाने बिहारबाबत कडक भूमिका घेतली आहे. गर्दीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले तर संबंधित जिल्हाधिकारी ती सभा तत्काळ थांबवू शकतात आणि तसे त्यांना अधिकार आहेत असे आयोगाने म्हटले आहे. केंद्रीय आयोगाने बिहारमधील रणधुमाळीत उतरलेल्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना, प्रदेशाध्यक्षांना व सरचिटणिसांना पत्र पाठवून हा इशारा दिला आहे. ९ ऑक्टोबरला आयोगाने व त्याच सुमारास गृहमंत्रालयानेही निवडणूक-पोटनिवडणूक प्रचार काळात गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत दिशानिर्देश दिले होते. त्याकडे सर्रास काणाडोळा होत असल्याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. असे नेते व उमेदवार स्वतःचा व जनतेचाही जीव धोक्यात टाकत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सभांवर बंदी घालण्याचे आयोगाला अधिकार
कोरोना नियमांचे वारंवार उल्लंघन होत असेल तर प्रचारसभांवर बंदी घालण्याचेही अधिकार आयोगाला आहेत अशी आठवण माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी करवून दिली आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना कुरेशी यांनी सांगितले, की सभांमध्ये वारंवार कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणे महागात जाऊ शकते. या परिस्थितीत फरक पडला नाही तर लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी निवडणूकच स्थगित करण्याचेही अधिकार आयोगाला आहेत. मात्र तसे झाले तर ती भारतासारख्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशासाठी नामुष्कीची बाब ठरेल. त्यामुळे राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीच परिपक्वता दाखवून कोरोना नियम पाळायला हवेत असेही कुरेशी म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना काळात प्रचाराचे नियम
- सभेतील श्रोत्यांनीच नव्हे तर वक्त्यांनीही मास्क वापरणे सक्तीचे
- गर्दीत सामाजिक अंतरभानाचे कडक पालन करा
- बंद सभागृहांत होणाऱ्या मेळाव्यांना २०० पेक्षा जास्त उपस्थिती नको.
- सभेत हजर राहिलेल्या दोघांमध्ये ६ फुटांचे अंतर हवे.
- नेत्यांनी गळाभेटी किंवा हस्तांदोलन टाळावे.
- सभा स्थानी टिश्यू पेपरची व सॅनिटायजरची सुविधा हवी.
- सभेच्या ठिकाणाची साफसफाई करण्याची जबाबदारी आयोजक पक्षाचीच.