Loksabha 2019 : भाजप नेत्याने ट्विटरवरून हटवली 'चौकीदारी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 एप्रिल 2019

माझा दलीत चेहरा असल्यामुळे भाजपने मला टाळले आहे. परंतु, देशभर माझे संघटन आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला चुकीचा पक्ष निवडल्याचे सांगितले होते.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावण्यास सुरवात केली. परंतु, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ट्विटरवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला आहे.

वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांचे तिकीट जाहीर न झाल्याने वैतागून त्यांनी "भाजप दलितांना धोका देणार नाही, अशी मला आशा आहे,' असे संतप्त उद्‌गार काढले. यापुढेही जात त्यांनी ट्विटरवरून आपल्या नावापुढील 'चौकीदार' हा शब्द हटवला असून, आता ते डॉ. उदित राज झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. उदित राज म्हणाले, 'माझा दलीत चेहरा असल्यामुळे भाजपने मला टाळले आहे. परंतु, देशभर माझे संघटन आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला चुकीचा पक्ष निवडल्याचे सांगितले होते. शिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पक्ष मला उमेदवारी देणार नसल्याचे सांगितले होते. यापुढे कोणत्या पक्षात जायचे हे लवकरत कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार आहे.'

दरम्यान, उदित राज यांनी सनदी सेवेचा राजीनामा देऊन "भारतीय न्याय पक्षा'ची स्थापना केली होती. मात्र, 2009 मध्ये ते पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधला व मोदी लाटेत ते दिल्लीतून निवडूनही आले. मात्र, काही काळातच त्यांचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाल्याचे सांगितले जाते. गेली किमान दोन वर्षे उदित राज सूचक विधाने करून पक्षाच्या नेतृत्वाला शाब्दिक आहेर देत होते. त्याच वेळी त्यांचे तिकीट कापले जाणार, याची कुणकूण त्यांना लागल्याची चर्चा होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: north west delhi bjp candidate udit raj remove chowkidar word twitter handle