शिवकुमार माझे सच्चे मित्र, त्यांच्यासाठी प्रार्थना : येडियुरप्पा

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

शिवकुमार यांची सलग चार दिवस चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांना आज (बुधवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

बंगळूर : बेकायदा मालमत्ताप्रकरणी कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक व माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अटक केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शिवकुमार माझे सच्चे मित्र असून, ते या प्रकरणातून बाहेर पडावेत अशी माझी प्रार्थना असल्याचे म्हटले आहे.

योडियुरप्पा म्हणाले, की शिवकुमार राजकारणात प्रतिस्पर्धी असले, तरी ते माझे सच्चे मित्र आहेत. या प्रकरणात ते निर्दोष असल्याची मला खात्री आहे. लवकरच ते या दिव्यातून सहीसलामत बाहेर पडतील व राजकारणात सक्रिय होतील. त्यांना अटक होण्याने मी काही आनंदी नाही.

शिवकुमार यांची सलग चार दिवस चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांना आज (बुधवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. शिवकुमार यांची अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे; तर शिवकुमार यांच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आज कर्नाटकमध्ये बंदची घोषणा करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not happy with the arrest of D K Shivakumar says B S Yediyurappa