आता आठवड्यातील 2 दिवस कडकडीत टाळेबंदी; या राज्याने केली घोषणा

कार्तिक पुजारी
Monday, 20 July 2020

पश्चिम बंगालमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कोलकाता- देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात आता 5 दिवसांचाच आठवडा असणार आहे. उरलेले दोन दिवस राज्यात कडक टाळेबंदी पाळली जाणार आहे.

NASA ला अंतराळात पहिल्यांदाच सापडला अनोखा कोरोना
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पश्चिम बंगालमधील काही भागात समुदाय प्रसार (कम्युनिटी ट्रान्समीशन) पाहायला मिळालं आहे. ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात कठोर टाळेबंदीची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी याला प्रतिसाद द्यावा, असं पश्चिम बंगालचे गृह सचिव आलपन बंडोपाध्याय म्हणाले आहे. पीटीआयने याबाबते वृत्त दिले आहे.

टाळेबंदी दरम्यान सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, सर्व आवश्यक कार्यक्रम, दळनवहन, बाजार, उद्योग आणि व्यापार पूर्णपणे बंद असणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये सध्या 739 कन्टेंमेंट झोन झाले आहेत. त्यामुळे अधिक खबरदारी घेतली जात आहे.  पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 42,487 कोरोनाबाधित आढळले आहे. तर आतापर्यंत 1,112 लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. रविवारी बंगालमध्ये 2,278 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

आम्ही तुमच्याकडून 9 कोटी डोस घेऊ; लस निर्मिती आधीच या देशाने केला करार
उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्येही टाळेबंदी

पश्चिम बंगाल आधी उत्तर प्रदेश सरकारने आठवड्यातील दोन दिवस टाळेबंदी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी उत्तर प्रदेशात कडकडीत टाळेबंदी असणार आहे. कर्नाटक राज्यानेही 22 जूलैपर्यंत टाळेबंदी असणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. गेल्या दिवसात तब्बल एक लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे, तर आतापर्यंत 27 हजारांपेक्षा अधिकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या 11,18,035 इतकी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now strictly 2 days a week complete lockdown This state announcement