
Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना मिळाला हत्यार बाळगण्याचा परवाना
नवी दिल्ली - प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर गेले अनेक महिने सातत्याने शिरच्छेदाच्या धमक्या मिळणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना स्वसंरक्षणार्थ ‘पिस्तुल' बाळगण्याचा परवाना मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना स्वसंरक्षणासाठी हा परवाना दिल्याचे आज सांगण्यात आले आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्याबाबतच्या कथित वादग्रस्त विधानानंतर देशातील अनेक भागांत निदर्शने झाली आणि नुपूर शर्मा जीवे मारण्याच्या धमक्याही सातत्याने मिळत आहेत. दुसरीकडे नुपूर शर्मावर अनेक गुन्हेही दाखल दाखल झाले असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची एकत्रित सुनावणी करण्यास मान्यता दिली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर देश-विदेशातून चौफेर निषेध झाला होता. त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काही मुस्लिम देशांनी अधिकृत नाराजीही व्यक्त केली होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर कुवेत, कतार आणि इराणसह अनेक मुस्लिम गटांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय प्रवक्तेपदावरून व पक्षातूनही शर्मा यांना निलंबित केले होते. यासोबतच दिल्ली भाजपचे प्रवक्ते नवीनकुमार जिंदाल यांनाही वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पक्षाने पदावरून हटवले होते. भाजपने तेव्हा एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, हा पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणत्याही धर्माच्या पूज्य नेत्यांचा अपमान केल्याचा निषेध करतो.