Omicron Virus | HIV बाधिताकडून ‘ओमिक्रोन’चा संसर्ग? लंडनमध्ये संशोधन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Virus
एचआयव्हीबाधिताकडून ‘ओमीक्रोन’चा संसर्ग

HIV बाधिताकडून ‘ओमिक्रोन’चा संसर्ग? लंडनमध्ये संशोधन सुरू

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमीक्रोन प्रकार आढळल्यानंतर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा प्रसार वेगाने होतो ही सर्वांत चिंतेची बाब आहे. यामुळे डेल्टा, डेल्टा प्लस आणि अन्य प्रकारांपेक्षा धोकादायक मानला जात आहे. ओमीक्रॉनचा उगम पहिल्यांदा कोठून झाला, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. एचआयव्ही/एड्सच्या रुग्णातून त्यांचा संसर्ग झाल्याची शक्यता लंडनमधील ‘यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूट’च्या एका शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे. आफ्रिकी देशांत तशा घटना आढळल्या आहेत.

ओमीक्रॉन धोकादायक असल्याचे सांगण्यात येत असून आफ्रिकेसह अन्य देशांतही त्याचा फैलाव होत आहे. भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासावर तातडीने बंदी घालण्याची गरज नाही. मात्र परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा मागोवा ठेवणे, त्यांचे विलगीकरण करणे आवश्‍यक आहे. या प्रकाराचा सामना करण्यासाठी उपाय योजण्याची व बूस्टर डोस देण्याची वेळ आली आहे.

- डॉ. गगनदीप कांग, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, ख्रिस्तीयन मेडिकल कॉलेज, वेल्लोर

सर्वाधिक धोकादायक

कोरोनाच्या या प्रकाराचे वेगाने ३० वेळा उत्परिवर्तन होते. ही जास्त चिंतेची बाब आहे. अल्फा, बिटा आणि डेल्टा या प्रकाराच्या तुलनेत जलद गतीने हा प्रकार रुग्णांच्या शरीराचा ताबा घेतो, हे घातक आहे, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Omicron : दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेले दोन प्रवाशी पॉझिटिव्ह!

भारतीय तज्ज्ञांचे मत

डेल्टा प्रकारापेक्षा ओमीक्रोन घातक आहे, का हे पाहण्यासाठी यावर संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. सध्याच्या कोरोना प्रतिबंधक लशी या प्रकारावर प्रभावी ठरत नसल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाही. आफ्रिकी देशांमध्ये लशींची तुटवडा असल्याने तेथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा नवा प्रकार तेथून आल्याची शक्यता भारतीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

दोन बूस्टर डोसवर मॉडर्नाचा अभ्यास

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूच्या ओमीक्रोन या नव्या प्रकाराप्रमाणेच संभाव्य प्रकारांना रोखण्यासाठी दोन बूस्टर डोसचा अभ्यास करीत असल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या औषध उत्‍पादक कंपनीने शुक्रवारी (ता.२६) केला. कोरोनाच्‍या संभाव्य प्रकारांना रोखण्यासाठी दोन बूस्टर डोसवर मॉडर्ना काम करीत आहे. ओमीक्रोनचा प्रभाव नाहीसा करण्याच्यादृष्टीने सध्याच्या लशी सक्षम आहेत का, याच्या चाचण्याही सुरू असून काही दिवसांतच त्याचे निष्कर्ष हाती येतील, असे कंपनीने निवेदनाद्वारे सांगितले आहे.

Web Title: Omicron Infection From Hiv Infection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusHIV
go to top