जगलो...वाचलो...तर नक्की भेटू...

bsf soldier
bsf soldier

जय महाराष्ट्र! भारत-पाकिस्तान सीमेवरून फौजी बोलतोय.
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
तुम्हालाही शुभेच्छा, कसे आहात...
महाराष्ट्रात कधी येणार आहात....
सीमेवर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे...जगलो...वाचलो...तर नक्की भेटू...भारत माता की जय.
पत्रकार व एका जवानामधील हा संवाद.

महाराष्ट्रातील एक जवान प्रत्येक सणाला न चुकता मोबाईलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आमच्या दोघांमधील संवाद हा केवळ 10 ते 12 सेंकदाचाच. परंतु, हा संवाद देशप्रेम म्हणजे काय असते, हे दाखवून देतो. पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्यामुळे हा जवान प्रत्येक सणाच्या शुभेच्छा इतरांपर्यंत पोचविण्याचा संदेश माझ्याकडे देत असतो. गेल्या दोन वर्षांपासून न चुकता प्रत्येक सणाला फोन येतोच. या जवानाचा रविवारी (ता. 30) म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोन आला. प्रथम जय महाराष्ट्र हे शब्द ऐकू आल्यानंतर ऊर भरून आला. शुभेच्छा दिल्यानंतर विचारपूस केली. सीमेवर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. "जगलो वाचलो तर नक्की भेटू...भारत माता की जय...", एवढे बोलून जवानाने मोबाईल बंद केला.

देशभर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आपले जवान कुटुंबियांपासून दूर आहेत. डोळ्यात तेल घालून देशसेवा करत आहेत. या जवानांमुळेच आपण सुखाने झोपू शकतो आणि त्यांच्याच ‘वन रॅंक वन पेन्शन’च्या (ओआरओपी) मुद्यावरून सध्या देशभर राजकारण सुरू आहे. जवानांबद्दल कोणी राजकारण केले की मनात चीड निर्माण होते.

'सीमेवर तैनात असताना कोणती वेळ कशी असेल? हे काहीच माहित नसते. सीमेवर असताना फक्त एकच विचार सुरू असतो तो म्हणजे देशाचा. देशाच्या विविध भागांवरील सीमांवर वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण अनुभवयाला मिळते. उन, वारा, पाऊस व थंडीमध्ये उभे राहून आमचे जवान बंधू देशसेवा करतात. देशप्रेम काय असते हे फक्त सीमेवर असतानाच कळते,' असे एक जवान मित्र सांगतो.

‘वन रॅंक वन पेन्शन’च्या मुद्यावरून रामकिशन ग्रेवाल या माजी सैनिकाने बुधवारी (ता. 2) आत्महत्या केली. सैनिकाच्या आत्महत्येवरून मोठे राजकारण झाले. देशभर राजकारणाच्या बातम्यांचे रकानेच्या रकाने भरून आले. राजकारण झाले...प्रसिद्धीही झाली. सरकारकडून ‘ओआरओपी’ची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असे लष्करात 30 वर्षे सेवा केलेल्या ग्रेवाल यांनी मुलाला शेवटच्या क्षणी फोन करून सांगितले.

जवानांना आत्महत्या करण्याची वेळ का येते? याचा प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. ग्रेवाल यांच्या आत्महत्येमुळे म्हणा अन्य कोणत्या कारणामुळे ‘ओआरओपी’ची मागणी पूर्णही होईल. पण, यासाठी कोणा एकाचा जीव जायलाच हवा का? ऐन तारुण्याच्या काळात सीमेवर उभे राहून देशसेवा बजावलेल्या जवानांना आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये, अशी आपली व्यवस्था हवी. देशातील विविध राज्यांमधील आमदारांच्या वा खासदारांच्या वेतनात किंवा निवृत्तीवेतनात वाढ होते. मात्र, वेतन वा निवृत्तीवेतनात वाढ करावी म्हणून लोकप्रतिनिधी कधी उपोषणाला बसल्याचे दिसत नाही. तशी त्यांच्यावर वेळही येऊ नये; मात्र त्याचवेळी एखाद्या जवान देशातील इतर जवानांसाठी आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत असेल, तर आपल्या व्यवस्थेत कुठेतरी काही चुकीचे घडतेय, हेही समजून घ्यायला हवे. प्रत्येक घटनेचे राजकीय भांडवल होऊ नये, ही अपेक्षा आहेच. शिवाय, एखाद्याला आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गावर नेण्याइतकी व्यवस्थाही निर्ढावू नये. लोकांच्या अपेक्षा आणि व्यवस्थेत बॅलन्स असायला हवाच. तो नेमका चुकतोय की काय, असं वाटतंय...

तुम्हाला काय वाटतं? अवश्य लिहा...सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला webeditor@esakal.com वर पाठवा. Subject मध्ये लिहाः OROP

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com