सर्वांत श्रीमंत मंदिरात आता फक्त हिंदू कर्मचारीच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

केवळ भारतातीलच नव्हे तर, बहुदा जगातील सर्वांत श्रीमंत हिंदू मंदीर असलेल्या तिरुपती देवस्थान विषयी आंध्र प्रदेशच्या राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदूंचे श्रद्धा स्थान असलेल्या तिरुपती देवस्थानात कोणत्याही बिगर हिंदूला नोकरी न देण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे.

हैदराबाद : केवळ भारतातीलच नव्हे तर, बहुदा जगातील सर्वांत श्रीमंत हिंदू मंदीर असलेल्या तिरुपती देवस्थान विषयी आंध्र प्रदेशच्या राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदूंचे श्रद्धा स्थान असलेल्या तिरुपती देवस्थानात कोणत्याही बिगर हिंदूला नोकरी न देण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे.

त्यामुळे आता तिरुमल्ला तिरुपती देवस्थानात एकही बिगर हिंदू कर्मचारी राहणार नाही. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला असून, तो ऐतिहासिक असल्याचं मानलं जातंय. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

तिरुमल्ला तिरुपती देवस्थानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देवस्थान परिसरात ४४ बिगर हिंदू कर्मचारी आहेत. ही आकडेवारी २०१८ ची आहे. पण, आता राज्य सरकारनेच देवस्थानात केवळ हिंदूच सेवा देतील, असे जाहीर केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. पण, जर, बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला असले तर, त्यांना नोकरीवर कायम ठेवण्यात येईल आणि इतरांना कामावरून कमी करण्यात येणार आहे.

या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रमण्यम म्हणाले, ‘जर, तिरुपती देवस्थानचे कर्मचारी, धर्मांतर करत असतील, तर काहीच अडचण नाही. त्यांना धर्मांतर करण्याची मुभा आहे. त्याला कोणीही विरोध करणार नाही. अन्यथा त्यांना काम सुरू ठेवता येणार नाही आणि त्यांना महत्त्वाची पोस्टही देण्यात येणार नाही. कारण, यामुळे हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.’ हा निर्णय केवळ वरवरचा नाही तर, सरकार अचानक कर्मचाऱ्यांची तपासणी करणार आहेत, असेही सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीतच आंध्र प्रदेशात विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसची सत्ता आली आहे. भाजपचाही सरकारला पाठिंबा आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि रेड्डी यांचे आघाडी सरकार आंध्र प्रदेशात अँटी हिंदू अजेंडा राबवत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्याचवेळी राज्य सरकारने तिरमल्ला देवस्थानातील बिगर हिंदूंना कामा वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी स्वतः ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. त्यांनी तिरुमल्ला ते तिरुपती बसच्या तिकिटाच्या मागीलबाजूवरील जाहिरातीत आपल्या कुटुंबाचे फोटो छापले होते. ती जाहिरात पवित्र जेरुसलेम टूर या धार्मिक पर्यटनाची होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only the Hindu staff in the richest temple now