काहीही निर्णय होऊ दे, आम्ही चिदंबरम यांच्यासोबत : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

उच्चशिक्षित आणि राज्यसभेचे सदस्य असलेले पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली आहे. आज त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. कारण, ते सत्य बोलून सरकारचे अपयश सर्वांसमोर आणत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने पी. चिदंबरम यांच्या मागे लागले आहे. कारण, ते उघडपणे सत्य बोलत असतात आणि सरकारचे अपयश सर्वांसमोर आणत असतात. पण, काहीही होऊ दे आम्ही चिदंबरम यांच्यासोबत उभे आहोत, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आणि ईडीचे पथक रात्री त्यांच्या घरी पोहचले आणि हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, चिदंबरम घरी नसल्याने या पथकाला अखेर माघारी परतावे लागले. या प्रकरणी आता काँग्रेसने त्यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. 

प्रियांका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की उच्चशिक्षित आणि राज्यसभेचे सदस्य असलेले पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली आहे. आज त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. कारण, ते सत्य बोलून सरकारचे अपयश सर्वांसमोर आणत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि सत्यासाठी लढत राहू. मग, निर्णय काहीही असो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P Chidambaram is being hunted we stand by him says Priyanka Gandhi