INX मीडिया गैरव्यवहार : चिदंबरम यांना होणार अटक?

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने आज (मंगळवार) फेटाळला आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांच्यावर ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी हा गैरव्यवहार झाला, त्यावेळी पी. चिदंबरम हे मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. यापूर्वी चिदंबरम यांची अनेकदा चौकशीही करण्यात आली होती. 

मागील वर्षी चिदंबरम यांनी अंतरिम जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला होता. मात्र, आता न्यायालयाने हा अंतरिम जामीन रद्द केला आहे. त्यामुळे चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारकडून जाणूनबुजून असे केले जात आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P Chidambaram Fails To Get Protection From Arrest In INX Media Case