
नवी दिल्लीः प्रसिद्धीची आस न बाळगता सेवेचे असिधारा व्रत घेतलेल्या चेहऱ्यांना जगासमोर आणण्याची परंपरा केंद्र सरकारने याही वेळी पद्म पुरस्कार निवडीतून जपली आहे. महाराष्ट्रातील अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक व लेखक मारुती चितमपल्ली, नाडीपरिक्षेतून रोगनिदान आणि गरिबांवर नाममात्र दरात औषधोपचार करणारे होमिओपथी डॉक्टर विलास डांगरे, १०२ वर्षांच्या गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्ययोद्ध्या लिबिया लोबो सरदेसाई आणि पर्यावरणविषयक कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्यासह विविध क्षेत्रांमधील २४ हून अधिक सेवाव्रतींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, दिवंगत नेते मनोहर जोशी, पंकज उधास, शेखर कपूर, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी देशपांडे, चैतराम पवार, मारुती चित्तमपल्ली, वासुदेव कामत, सुभाष शर्मा, राणेंदर भानू माजुमदार, सुभाष शर्मा, विलास डांगरे यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत.