पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; गोळीबारात बीएसएफचा जवान हुतात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 13 November 2020

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे सुरूच असून आज दुपारी एकच्या सुमारास झालेल्या गोळीबारात राकेश दोवाल यांच्या डोक्याला गोळी लागली

नवी दिल्ली- जम्मू काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक उपनिरीक्षक हुतात्मा झाला तर अन्य एक जण जखमी झाला. राकेश दोवाल असे हुतात्मा अधिकाऱ्याचे नाव असून त्यांची बारामुल्ला येथे नियंत्रण रेषेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर पाकिस्तानने बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यातही सीमेवर भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे सुरूच असून आज दुपारी एकच्या सुमारास झालेल्या गोळीबारात राकेश दोवाल यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच वासू राजा हे जवान जखमी झाले. त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याचे सूत्राने सांगितले. दोघेही एकाच ठिकाणी तैनात होते. जखमी जवानाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून प्रचंड प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देत असतानाच ते गंभीर जखमी झाले. ते मूळचे उत्तराखंडचे रहिवासी होत. त्यानंतरही पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता आणि त्याला उत्तर दिले जात असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पाकिस्तानने बांदिपोरा येथे गुरेझ सेक्टरमध्ये आज दुपारी गोळीबार केला. तत्पूर्वी कुपवाडा जिल्ह्यात केरान सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan firing at border bsf army man died rakesh dowal