भारतीय जवानांवर पाकिस्तानला विश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan trusts Indian soldiers

भारतीय जवानांवर पाकिस्तानला विश्‍वास

पुणे : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध जगाला माहिती आहेत. दोन्ही देशातील सैन्य आपापल्या सीमारेषेवर संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. अशात एक गोष्ट थक्क करणारी ठरते ती म्हणजेच भारतीय जवानांवर पाकिस्तान सैन्याचा असलेला विश्‍वास... ही बाब आश्‍चर्यचकित करणारी आहे. जम्मू येथील सुचेतगड या सीमा भागात भारतीय हद्दीत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. पाकिस्तान सैन्य या भागात क्वचितच फिरकते. याचे कारण म्हणजे आपल्याला भारतीय जवानांकडून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची मानसिकता पाकिस्तानच्या सैन्यामध्ये असल्याचे ‘बीएसएफ’च्या एका अधिकाऱ्याने नमूद केले.

सुचेतगड येथील भारत-पाक सीमेवर दोन्ही देशांची चौकी असून दोन्ही देशातील सर्व प्रकारचे पत्र व्यवहार या पोस्टद्वारे केले जातात. पाकिस्तानचे सियालकोट सुचेतगडापासून ११ किलोमीटरवर आहे. पाकिस्तान याला सीमा भाग म्हणून जाहीर करत नसला, तरी भारताने यास आंतरराष्ट्रीय सीमेचा दर्जा देत सुरक्षेच्या अनुषंगाने येथे कुंपण घातले आहेत. या भागातील स्थानिक शेती व्यवसाय करत असून त्यांच्या उत्पन्नाचा हा एकमेव पर्याय आहे.

अनेकांच्या शेती व नातेवाईक सीमेच्या पलिकडे असल्याने सीमेपलिकडे ये-जा करण्यासाठी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवत नाही. यासाठी बीएसएफ नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबर त्यांना सहकार्यही करत आहे. शेतीसह सण-सोहळ्यादरम्यान नातेवाइकांच्या भेटीगाठी, मिठाई आदींचे आदान-प्रदान येथून होते. त्यामुळे अत्यंत सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळते. असे असले तरी देशाची सुरक्षा पाहता सैन्य आणि बीएसएफ डोळ्यात तेल ओतून संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

दोन्ही देशांना सावलीचा आसरा...

सुचेतगड येथील सीमारेषा पाहता, या ठिकाणी भारताने खांब रोवून आपली हद्द निश्‍चित केली आहे. या खांबावर काही आकडे टाकले असून झिरो पॉइंटवर असलेल्या दोन्ही देशांच्या पोस्ट दरम्यानच्या हद्दीवर असलेल्या ९१८ या क्रमांकाचा खांब आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. दोन देशांची विभागणी करणाऱ्या या खांबालाच एका पिंपळाच्या झाडाने सामावून घेतले आहे. जणू ही सीमाच या वृक्षाला मान्य नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा भेद न करता हे झाड दोन्ही देशांना समान सावली देते.

रेल्वे सेवा केली बंद

सुचेतगड येथे पूर्वी रेल्वे मार्ग होता. या मार्गावरून भारत ते पाकिस्तान दरम्यानचा प्रवास होत होता. ‘जम्मू-सियालकोट लाइन’ म्हणून या रेल्वे मार्गाची ओळख होती. सियालकोटमार्गे वजीराबाद जंक्शन ते जम्मू असा हा सुमारे ४३ किलोमीटरपर्यंतचा प्रवास. महाराजा रणबीर सिंह यांच्या पुढाकाराने १८९० मध्ये हा रेल्वे मार्ग तयार केला होता. परंतु स्वातंत्र्यानंतर सप्टेंबर १९४७ ला हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला.

Web Title: Pakistan Trusts Indian Soldiers Bsf Officer Explanation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..