
जैशे महंमदचा प्रमुख अझर मसूद, लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि म्होरक्या झाकिउर रेहमान या भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांवरही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही.
नवी दिल्ली - मसूद अझर आणि हाफिज सईद या दोन दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासह फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) ठरवून दिलेली सहा उद्दिष्टे पूर्ण करण्यात पाकिस्तानला अपयश आले असल्याने त्यांचे नाव ‘ग्रे’ लिस्टमध्ये कायम राहण्याची चिन्हे असल्याचे ‘एफएटीएफ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या यादीतून चार हजार जणांची नावे अचानक गायब होण्याचा प्रकारही चिंताजनक असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दहशतवाद्यांच्या आर्थिक हालचाली आणि त्यांना निधी पुरविणाऱ्यांवर ‘एफएटीएफ’ या जागतिक संस्थेतर्फे नजर ठेवली जाते. दहशतवाद्यांना आश्रय, निधी आणि पाठिंबाही मिळत असल्यावरून पाकला संस्थेने ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. यामुळे पाकिस्तानला आर्थिक मदत मिळविण्यात अडचणी येतात. यातून बाहेर येण्यासाठी ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करणे आणि इतर २७ उद्दिष्टे ठरवून दिली आहेत आणि ही उद्दिष्टे ठरावीक कालावधीत पूर्ण करायची आहेत. मात्र, पाकिस्तानने यातील अत्यंत फुटकळ अशी २१ उद्दिष्टे पूर्ण केली असली तरी मूलभूत उद्दिष्टांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे ‘एफएटीएफ’च्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे २१ ते २३ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. जैशे महंमदचा प्रमुख अझर मसूद, लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि म्होरक्या झाकिउर रेहमान या भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांवरही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही. पाकिस्तान सरकारने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या ७६०० जणांच्या यादीतील चार हजारांहून अधिक नावे अचानक गायब झाली आहेत.