गोव्याचे पर्यावरणमंत्री बचावले; दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाला आग

अवित बगळे
Monday, 30 September 2019

काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव आज मध्यरात्रीच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना आला. या प्रवाशांत गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संचालक सायमन डिसोझा, कृषी संचालक माधव केळकर, पर्यावरण खात्यातील विशेष कार्य अधिकारी संजीव जोगळेकर यांचा समावेश होता.
 

पणजी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव आज मध्यरात्रीच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना आला. या प्रवाशांत गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संचालक सायमन डिसोझा, कृषी संचालक माधव केळकर, पर्यावरण खात्यातील विशेष कार्य अधिकारी संजीव जोगळेकर यांचा समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाईट क्र. 06 ई 336ने हे सगळे केंद्रीय पर्यावरण सचिव के. सी. मिश्रा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला चालले होते. उद्या (ता.30) दुपारी 12 वाजता त्यांची भेट होणार होती. साडेदहा वाजता विमानाने दाबोळी विमानतळावरून उड्डाण केले. त्यानंतर 15 मिनिटांनी पायलटाने आपण परत दाबोळी विमानतळावर विमान आपत्तकालीन स्थितीत उतरवत असल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशात एकच घबराट पसरली मात्र विमान गोव्याला परत का नेले जात आहे याची नेमकी माहिती त्यांना विमान उतरेपर्यंत देण्यात आली नव्हती.

दाबोळी विमानतळावर रात्री साडेअकरा वाजता विमान उतरल्यावर विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाला आग लागल्याने विमान तातडीने माघारी वळवावे लागल्याचे कारण प्रवाशांना देण्यात आले. या प्रवाशांना मध्यरात्री 12.50 वाजताच्या विमानातून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

दाबोळी विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांनी तातडीने आपल्या आप्तस्वकीयांची संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. सर्वांच्या बोलण्यात सुदैवाने संभाव्य दुर्घटनेतून बचावल्याचा सूर होता. दाबोळी विमानतळावर गेल्या महिनाभरात अनेकदा धावपट्टीवर कुत्रे आल्याने विमानाला अपघात होता होता वाचला होता.

गेल्या महिनाभरात दोन वेळा त्यामुळे ऐनवेळी धावपट्टीच्या शेवटच्या टोकाकडे विमान पोचत आले असतानाही उड्डाण रद्द करण्याची वेळ दोनवेळा वैमानिकावर आली होती. दाबोळी विमानतळ परिसरातील कुत्रे त्यानंतर पकडून त्यांना इतरत्र हलवण्यात आले होते. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारशी केलेल्या कराराची आठवणही यानिमित्ताने विमानतळावरील हवाई वाहतुकीचे नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या नौदलाने राज्य सरकारला करून दिली होती. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी तातडीने दाबोळी विमानतळाला भेट देत पाहणीही केली होती.

विमानतळाच्या बाहेर असलेल्या परिसरात कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या आहेत. इतस्तत फेकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे पक्षांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पक्षांची विमानाला धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नौदलाने अनेकदा वर्तवली आहे. मात्र आज विमानाच्या इंजिनात पक्षी घुसल्याने आग लागली की काय याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

विमानाच्या डाव्या इंजिनाला आग लागल्याने विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरावे लागले. आम्ही सारे सुरक्षित आहोत. आग का लागली याचे कारण मात्र आम्हाला अद्याप समजू शकलेले नाही. - नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री गोवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panji-Delhi flight forced to land after fire incident