esakal | "तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच बघू"; शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet-Rana-Angry

सचिन वाझे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका मांडल्यामुळे नवनीत राणांना धमकावण्यात आल्याचा आरोप

"तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच बघू"; शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा आरोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

महाराष्ट्रात गेले काही दिवस राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यावर त्यांनी एका पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार आणि इतर आस्थापनांकडून महिन्याचे १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठली. याचे पडसाद लोकसभेतही उमटले. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकावर तोफ डागली, पण त्यानंतर त्यांना शिवसेना खासदाराकडून धमकावण्यात आल्याची तक्रार त्यांनी एका पत्राद्वारे केली.

सचिन वाझेंबद्दल नवीन गौप्यस्फोट, वसुलीसाठी होती A, B, C वर्गवारी

सचिन वाझे प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडताना सचिन वाझे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. त्यांनी अतिशय आक्रमक होत आपलं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापुढे मांडले. पण त्यामुळे त्यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना धमकावल्याची तक्रार त्यांनी केली. तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच बघू. तुला पण तुरूंगात टाकू", अशा शब्दात अरविंद सावंत यांनी नवनीत राणांना धमकावल्याचं त्यांनी ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. एखाद्या महिलेला अशापद्धतीने धमकावणं म्हणजे संपूर्ण स्त्रिवर्गाचा अपमान असून अरविंद सावंत यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती राणा यांनी केली.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

"लोकसभेतील काही खासदारांनी आताच महाराष्ट्रात खंडणी वसूल करण्याबाबत होत असलेल्या प्रकाराबाबत संसदेत माहिती दिली. मलाही एक मुद्दा अधोरखित करावासा वाटतो. १६ वर्षे निलंबित असणारा अधिकारी ६० दिवस पोलीस स्टेशनमध्ये, कारागृहात शिक्षा भोगून आलेला आहे. अशा अधिकाऱ्याला पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करून घेण्याच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. फडणवीस यांनी वाझेंचा इतिहास पाहता त्या गोष्टीला नकार दिला. पण उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर त्यांनी लगेच परमबीर सिंह यांच्याकरवी सचिन वाझेंना पोलीस सेवेत दाखल करून घेतलं. सचिन वाझे प्रकरणामुळे परमबीर सिंह यांना पदावरून हटवण्यात आलं. पण आता गृहमंत्र्यांचे नाव यात समाविष्ट झालेलं दिसत आहे. असं खरंच झालं तर संपूर्ण देशात असा प्रकार सुरू होईल", अशी भीती खासदार नवनीत राणांनी संसदेत बोलताना व्यक्त केली.

अरविंद सावंत म्हणाले...

"मी एक शिवसैनिक आहे. मी कोणालाही धमकावलेलं नाही. विशेष म्हणजे, एखाद्या महिलेला तर मी कधीही धमकावणार नाही. त्या नेहमी मला दादा, भाऊ अशी हाक मारतात. मीदेखील त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलतो. त्यामुळे त्यांनी असा आरोप का केला हे माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, संसदेत त्या जेव्हा बोलायला उभ्या राहतात तेव्हा त्यांच्या देहबोलीतून कायम उद्धव ठाकरेंबद्दलचा तिरस्कार दिसतो. आज ते ज्या प्रकारे बोलल्या तसं याआधीही अनेकदा बोलल्या आहेत. त्यामुळे आज मी त्यांना धमकावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलं.

loading image