संसदेवरील हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण; PM मोदींनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.

नवी दिल्ली : संसदेवर हल्ला होऊन आज 19 वर्षे झाली. 13 डिसेंबर, 2001 रोजी दहशतवाद्यांनी देशाच्या संसदेवर हल्ला केला होता. पाच बंदुकधारी लोकांनी संसदेच्या परिसरावर हल्ला करत तिथे अंधाधुंद असा गोळीबार केला होता. आज त्या काळ्या घटनेला 19 वर्षे पूर्ण झाली. त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री यांनी संसदेच्या संरक्षणार्थ प्राण गमावलेल्या लोकांच्या आठवणीत श्रद्धांजली वाहिली आहे.

 पंतप्रधानांनी ट्विट करुन म्हटलं की, आपण आजचा संसदेवर झालेला भ्याड हल्ला कधीही विसरणार नाही. आपल्या संसदेची सुरक्षा करताना ज्या प्राण गमावलेल्या लोकांचं शौर्य आणि बलिदानाची आठवण आपण काढूया. भारत नेहमीच त्यांच्या ऋणात राहिल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वीरांच्या आठवणी जाग्या करत म्हटलं की, 2001 मध्ये लोकशाहीचे मंदिर संसद भवनावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शत्रूंशी दोन हात करणाऱ्या भारतमातेच्य वीर पुत्रांना मी कोटी कोटी नमन करतो. कृतज्ञ राष्ट्र आपल्या अमर बलिदानासाठी सदैव ऋणी राहिल.

या हल्ल्यादरम्यान दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या एक महिला कर्मचारी, संसद परिसरात तैनात असलेले एक वॉच एँड वार्ड कर्मचारी आणि एक माळी शहिद झाला होता. तर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parliament attack 19 years completed pm modi amit shaha paid homage to martyrs