
नवी दिल्ली: निवडणुकांमधील पराभवांचे विश्लेषण आणि पुढील वाटचालीचे धोरण निश्चित करण्यासाठी काँग्रेसने उदयपूर येथे १३ ते १५ मे असे चिंतन शिबिर घेण्याचे जाहीर केले. या मंथनासाठी नवसंकल्प चिंतन शिबिर अशी संकल्पना ठरविली असून चर्चेच्या निमित्ताने असंतुष्ट जी-२३ गटातील नेत्यांना चुचकारण्याचा काँग्रेस नेतृत्वाने केला आहे.
निवडणुकांमधील चुकांबाबत विचारमंथन करण्याबरोबरच आगामी विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची धोरण आखणी हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे. पक्षाची सत्ता असलेल्या राजस्थानातच चिंतन शिबिर घेण्याचा निर्णय झाला. उदयपूर येथे होणारे शिबिर हे चिंतनासाठी असल्याने यात राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय, कृषी, संघटना बांधणी आणि रोजगार व तरुणाई यासारख्या विषयांवर पक्षाच्या नेत्यांची व्यापक चर्चा आणि त्यातून आगामी धोरणाची आखणी करणारे ठराव मंजूर केले जातील. या सहा विषयांवरील ठरावांच्या मसुद्यासाठी प्रत्येकी नऊ सदस्यीय समूह नेमण्यात आले आहेत. यात जी -२३ गटातील नेत्यांना स्थान दिले आहे.
राजकीय ठरावासाठीच्या समूहाचे समन्वयक राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे असतील. तर गुलाम नबी आझाद, शशी थरूर यांना सामावून घेण्यात आले. या समूहामध्ये महाराष्ट्रातील मंत्री अशोक चव्हाण हे देखील आहेत. तर सामाजिक न्यायाशी संबंधित ठरावावरील समुहाचे समन्वयक सलमान खुर्शिद आहेत. आर्थिक विषयावरील ठरावासाठीच्या समुहाचे समन्वयक पी. चिदंबरम असतील. त्यांच्यासोबत सिद्धरामय्या, आनंद शर्मा, सचिन पायलट, मनीष तिवारी, आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. संघटनेशी संबंधित ठरावाच्या समुहाचे समन्वयकपद मुकुल वासनिक यांना देण्यात आले. कृषी क्षेत्राशी संबंधित ठरावावरील समुहाचे समन्वयक हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा असतील. यात नाना पटोले, शक्तीसिंह गोहील यांचा समावेश आहे.तर बेरोजगारी व तरुणाई विषयावरील ठरावासाठीच्या समुहाचे समन्वयक अमरिंदरसिंग वारिंग असतील.
भाजप आता ‘ॲक्शन मोड’ मध्ये
गु जरात, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक यांमुळे भारतीय जनता पक्ष आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आहे. आता देशातील सर्वच राज्यातील कमकुवत बुथवर पक्ष लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळविली. मात्र उत्तर प्रदेशात अनेक जागांवर पक्षाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाला कोणताही धोका पत्कारायचा नाही. त्यासाठी प्रत्येक बूथ सक्षम करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. प्रत्येक राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील बुथचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी कमकुमवत बुथ आहेत, तेथे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
पक्षाचा विस्तार करणार
राज्या-राज्यांत भाजपचे अस्तित्व नसलेले मतदारसंघ देखील शोधून तिथे पक्षाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच बुथ सक्षमीकरणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याद्वारा २०२४ मध्ये अपेक्षित यश साध्य करून घेण्याचा प्रयत्न पक्षाचा असेल. त्यादृष्टीने आज दिल्लीत बैठक झाली. बुथ सक्षमीकरणाबरोबरच निवडणुकांशी संबंधित वेगवेगळ्या समित्यादेखील स्थापन करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी देखील अशा बुथ सक्षमीकरणासाठी समिती स्थापन करण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, की भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्यासाठी पक्षाने त्या दिशेने काम करण्यास सुरवात केली आहे. वेगवेगळ्या कामांसाठी विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षामध्ये उत्साह आहे. म्हणून राज्याराज्यातील कार्यकर्त्यांशीप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनाही प्रेरित केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.