'पठाण'वरुन इंदूरमध्ये जातीय तणाव! ५० जणांवर गुन्हा दाखल : Pathan Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathan

Pathan Movie: 'पठाण'वरुन इंदूरमध्ये जातीय तणाव! ५० जणांवर गुन्हा दाखल

इंदूर : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यानं आपलं बिरुद पुन्हा एकाद सिद्ध केलं आहे. कालच प्रदर्शित झालेला त्याचा पठाण सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करतोय. एकीकडं प्रेक्षकांनी आणि शाहरुख खानच्या चाहत्यांनी पठाण सिनेमा डोक्यावर घेतलेला असताना दुसरीकडं या सिनेमाला विरोधही होतोय.

मध्य प्रदेशातील इंदूर इथं अशाच पठाणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं, यामध्ये जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणी पोलिसांनी ५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरर नाऊनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Pathan Movie Communal tension in Indore over Movie FIR has been registered against 50 people)

इंदूरमध्ये पठाणविरोधी आंदोलनात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह नारेबाजी केली. तसेच दिल्लीत २०२० मध्ये झालेल्या दंगलींचा दाखला देत मुस्लिमांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

मुस्लिमांविरोधातील या घोषणाबाजीनंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून काही मुस्लिम गटाकडूनही 'सर तन से जुदा' अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते, विनोद बन्सल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, इंदूरमधील बजरंग दलानं केलेल्या पठाणविरोधी आंदोलनात हा जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम गटातील ५० आणि ५ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. कलम २९५ आणि ३४ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.