राज्याराज्यात पटनाईक यांची "नवीन' खेळी 

धनंजय बिजले 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

राज्यसभेत गेल्या गुरुवारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला पाठिंबा देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या खेळीने विरोधी पक्षांच्या स्वप्नांना तडा गेला आणि उपाध्यक्षपदी संयुक्त जनता दलाचे हरिवंश नारायण सिंह निवडून आले. भाजपच्या नेतृत्वाखालील "एनडीए'कडे राज्यसभेत बहुमत नाही. संख्याबळाच्या या खेळात प्रत्येक खासदाराच्या मताला मोल प्राप्त झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सिंह यांचा विजय महत्त्वाचा आहे. तब्बल 41 वर्षांनंतर या पदावर प्रथमच कॉंग्रेसेतर पक्षाची व्यक्ती निवडून आली आहे. 

ओडिशा- राज्यसभेत गेल्या गुरुवारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला पाठिंबा देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या खेळीने विरोधी पक्षांच्या स्वप्नांना तडा गेला आणि उपाध्यक्षपदी संयुक्त जनता दलाचे हरिवंश नारायण सिंह निवडून आले. भाजपच्या नेतृत्वाखालील "एनडीए'कडे राज्यसभेत बहुमत नाही. संख्याबळाच्या या खेळात प्रत्येक खासदाराच्या मताला मोल प्राप्त झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सिंह यांचा विजय महत्त्वाचा आहे. तब्बल 41 वर्षांनंतर या पदावर प्रथमच कॉंग्रेसेतर पक्षाची व्यक्ती निवडून आली आहे. 

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे विरोधी पक्षांची महाआघाडी बनवून कडवे आव्हान निर्माण करण्याच्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना धक्का बसला. विरोधकांना एकत्रितपणे भाजपचा पराभव करणे शक्‍य होते; पण तसे घडले नाही. यामध्ये कळीची भूमिका साकारली ती नवीन पटनाईक यांनी. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरध्वनीनंतर पटनाईक यांनी "एनडीए'ला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. 

पुढील वर्षी ओडिशात विधानसभा निवडणुका आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ओडिशावर लक्ष केंद्रित केले आहे. सलग चार वेळा मुख्यमंत्री बनलेल्या नवीनबाबूंसाठी पुढील निवडणूक कठीण मानली जाते. एकाचवेळी कॉंग्रेस व भाजपशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी "एनडीए'ला पाठिंबा देणे सूचक मानले जाते. गेले चार वर्षे त्यांनी भाजप व कॉंग्रेसला समान अंतरावर ठेवण्याचे धोरण अंगीकारले. मात्र गेल्या महिन्यात लोकसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी मोदी यांच्या फोननंतर बिजू जनता दलाच्या खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. आता पुन्हा पटनाईक यांनी "एनडीए'ला मदतीचा हात दिला. त्यांच्या या "नवीन' खेळीने राज्यातील भाजपचे नेते, कार्यकर्ते तसेच विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाविरुद्ध ताकदीने उतरायचे की नाही, असा प्रश्न राज्यातील भाजप नेत्यांच्या मनात निर्माण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला नवे मित्रपक्ष जोडण्याचा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा प्रयत्न आहे. बिजू जनता दल आल्यास "एनडीए'ची ताकद निश्‍चित वाढणार आहे. नवीनबाबू हे मृदू स्वभावाचे असले तरी पक्के मुरलेले राजकारणी आहेत. पाठिंब्याच्या बदल्यात त्यांनी भाजपकडून नक्कीच काही ना काही शब्द घेतला असणार किंवा भाजपने तसा शब्द त्यांना दिला असणार. नवीनबाबूंचे पहिले प्राधान्य असेल ते ओडिशातील सत्ता कायम राखणे. त्यासाठी त्यांनी आता नवी राजकीय खेळी खेळण्यास सुरवात कली आहे. मात्र, या "नवीन' खेळीने विरोधक घायाळ झाले हे मात्र नक्की...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patnaik's new knock in the state