esakal | "आप क्रोनॉलॉजी समझिये"; पेगॅसस रिपोर्टच्या टायमिंगवर अमित शहांचं बोट
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

"आप क्रोनॉलॉजी समझिये"; पेगॅसस रिपोर्टच्या टायमिंगवर अमित शहांचं बोट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘पेगॅसस’ स्पायवेअरचा वापर करून केंद्र सरकारने पत्रकार आणि राजकीय नेत्यांवर पाळत ठेवल्याचे सुचविणाऱ्या अहवालावर आणि विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जोरदार टीका केली. भारताची प्रगती सहन न होणाऱ्या ‘व्यत्यय आणणाऱ्यांनी (विदेशी संघटना) अडथळे आणणाऱ्यांसाठी (देशांतर्गत विरोधक)’ हा अहवाल तयार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Pegasus row you understand the chronology Amit Shah denies the allegations aau85)

‘पेगॅसस’ प्रकरणावरून आज विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही सरकारला धारेवर धरले. यावरून विरोधकांवर टीका करताना अमित शहा म्हणाले,‘‘पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच निवडक माहिती लीक करण्याची ही वेळ पाहा. जागतिक पातळीवर शक्य तितक्या वेळा भारताची मानहानी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही जणांचीच या लोकांना फूस आहे. तुम्ही सर्व घटनाक्रम नीट लक्षात घ्या. आप क्रोनॉलॉजी समझिये ! व्यत्यय आणणाऱ्यांनी अडथळे आणणाऱ्यांसाठी तयार केलेला हा अहवाल आहे. व्यत्यय आणणारे म्हणजे विदेशी संघटना असून त्यांना भारताची प्रगती सहन होत नाही. अडथळे आणणारे हे भारतातीलच राजकीय पक्ष असून त्यांना भारताची प्रगती नको आहे. हा सर्व घटनाक्रम आणि त्यांचा संबंध भारतीयांना नक्कीच लक्षात येईल.’’ देशाचे कल्याण हेच मोदी सरकार सर्वांत पहिले उद्दीष्ट्य असल्याची ग्वाही मी भारतीय जनतेला देतो आणि काहीही झाले तरी हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी हे सरकार कायम प्रयत्नशील असेल, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

शहा यांनी काँग्रेसवरही टीका केली. ‘हा मुद्दा चर्चेला आला असताना काँग्रेसने त्यात उडी घेणे अनपेक्षित नव्हते. लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा त्यांना पुरेसा अनुभव आहे. त्यांच्या स्वत:च्या पक्षाची पडझड झाली असल्याने आता संसदेत जे काही सुधारणावादी असेल त्याला विरोध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप शहा यांनी केला.

मोदी सरकारशी संबंध असल्याचा पुरावा नाही - रविशंकर प्रसाद

या प्रकरणाचा भाजप किंवा मोदी सरकारशी संबंध असल्याचा थोडासुद्धा पुरावा नाही. ज्या ‘ द वायर’ने हे वृत्त प्रसिद्ध केले, त्यांनी आधी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याचे उघड झाले होते, तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने आपला ‘भारतविरोधी’ अजेंडा अनेकदा जाहीर केला आहे, असं भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

loading image