esakal | काय आहे 'गुपकार'? काँग्रेस आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरुन का जुंपलीये?
sakal

बोलून बातमी शोधा

gupkar.

गुपकार आघाडीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे

काय आहे 'गुपकार'? काँग्रेस आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरुन का जुंपलीये?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- गुपकार आघाडीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुपकार आघाडीचा उल्लेख गुपकार गँग असा केला. शिवाय या मुद्द्यावरुन काँग्रेसवरही हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी देशविरोधी घटकांना समर्थन देतात का?, असा सवाल शहा यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसने 18 नोव्हेबरला ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्ष गुपकार आघाडीचा भाग नसल्याचे पक्षाने स्पष्ट केलंय. याच पार्श्वभूमिवर गुपकार आघाडी नेमकी काय आहे, हे आपण पाहुया...

काय आहे गुपकार आघाडी? 

नॅशनल काँफरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांचे निवासस्थान श्रीनगरमध्ये 01, गुपकार रोडवर आहे. 4 ऑगस्ट 2019 रोजी 7 पक्षांनी याठिकाणी एकत्र बैठक घेतली होती. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या 7 पक्षांनी मिळून केंद्र सरकारच्या राज्यातील नितीविरोधात एक आघाडी केल्याची घोषणा केली होती. त्यांनतर या आघाडीला गुपकार आघाडी असं म्हणण्यात येऊ लागलं. ऑगस्ट 2020 मध्ये पुन्हा गुपकार आघाडीची बैठक झाली होती. 

गुपकार घोषणेमध्ये काय आहे?

गुपकार घोषणेमध्ये कलम 370 आणि 35 ए परत लागू करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच बरोबर जम्मू-काश्मीरचे संविधान आणि राज्याचा दर्जा पुन्हा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याची पूर्व स्थिती प्राप्त होईपर्यंत लढा सुरुच ठेवला जाणार असल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

गुपकार आघाडीने जारी केलेल्या पत्रकात म्हणण्यात आलंय की, 5 ऑगस्ट, 2019 रोजी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय असंवैधानिक होता आणि त्याचा उद्देश जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा होता. तसेच येथील लोकांची मुळ ओळख पुसण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

कोणते पक्ष गुपकार आघाडीमध्ये आहेत?

22 ऑगस्ट, 2020 मध्ये 7 राजकीय पक्ष याप्रकरणी भेटले होते. गुपकार आघाडीमध्ये नॅशनल काँफरन्स, पीडीपी, पीपल्स काँफरन्स, काँग्रेस, सीपीआय (एम) पीपल्स युवायटेड फ्रंड, पँथर्स पार्टी आणि अवामी नॅशनल काँफरन्स या पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसने या आघाडीचा भाग नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते रणदिप सुरजेवाला यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.