काश्मीरमध्ये ईदनिमित्त बाजारपेठा गजबजल्या; मोठा फौजफाटा तैनात

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

आज (ता.12) रोजी बकरी ईदमुळे सुरक्षा आणि तपास यंत्रणांची कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवताना खरी कसोटी लागणार आहे.

श्रीनगर  -  जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी नंदनवनात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आज (ता.12) रोजी बकरी ईदमुळे सुरक्षा आणि तपास यंत्रणांची कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवताना खरी कसोटी लागणार आहे. ईदच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज राज्यभरातील बॅंका, एटीएम खुले ठेवण्यात आले होते. नागरिकांनाही कुर्बानीसाठी अडीच लाख बोकड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

नागरिकांना घरपोच फळे, पालेभाज्या, गॅस सिलिंडर, अंडी आणि खाद्यपदार्थ पोचविण्यासाठी मोबाईल व्हॅन्स तैनात करण्यात आल्या असून, आज सुटीच्या दिवशीदेखील बॅंका सुरू होत्या, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. लोकांनीही आज बॅंका, एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेतन काढण्यासाठी आज बॅंकांमध्ये धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

हज यात्रेकरूंना सुरक्षा 
दरम्यान, हज यात्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंसाठीदेखील पुरेशी सोय करण्यात आली असून, 18 ऑगस्ट रोजी विमानतळावर सरकारी अधिकाऱ्यांना नेमले जाणार आहे. विमानतळे हज हाउसेसमध्ये हेल्पलाइन डेस्कदेखील सुरू करण्यात आले आहे. सरकारने अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून काही दिवसांसाठीची आगाऊ तजवीज आधीच केली आहे. 

श्रीगनरमध्ये खरेदीसाठी लोकांची झुंबड 
राज्यभर आरोग्यसेवा पूर्णक्षमतेने कार्यरत 
विमान वाहतूकही वेळापत्रकानुसार सुरू 
लोकांसाठी वेगळे तीनशे टेलिफोन बूथ 
पालिकांकडून काश्‍मीर खोऱ्यात सफाई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People celebrate Eid-ul-Azha in Jammu