'संपूर्ण देशाला ममता बॅनर्जींसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta Banerji & Kirti Azhad

'संपूर्ण देशाला ममता बॅनर्जींसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज'

हेही वाचा: दिल्लीची दादगिरी चालणार नाही: ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते कीर्ती आझाद आणि जनता दल (युनायटेड) चे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोन्ही नेत्यांनी दिल्लीत पक्षप्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर कीर्ती आझाद म्हणाले की, संपूर्ण देशाला ममता बॅनर्जींसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. आझाद म्हणाले, "ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मी देशाच्या विकासासाठी काम करेन, हे सांगताना मला आनंद होत आहे. आज देशाला त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे जी देशाला योग्य दिशा देऊ शकेल.

कीर्ती आझाद 1983 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. डिसेंबर 2015 मध्ये, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराबद्दल तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना उघडपणे लक्ष्य केल्याबाबत त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आझाद हे बिहारमधील दरभंगा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर सार्वत्रिक निवडणूक लढविली होती.

काँग्रेसचे बडे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याच्या वृत्तावर पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी असे करणाऱ्यांना संधीसाधू राजकारण असे संबोधले आहे. चौधरी म्हणाले की, हे केवळ संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे. या लोकांना वाटले की ते येथे नफा कमावू शकणार नाहीत." तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालची लूट करून भरपूर पैसा आणला असून दिल्लीत राजकीय धंदा करत असल्याचा आरोपदेखील चौधरी यांनी केला.

नितीश यांचे माजी सल्लागारही टीएमसीमध्ये दाखल

जेडीयूचे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे माजी सल्लागार आणि माजी राज्यसभा सदस्य वर्मा यांची 2020 मध्ये राज्यातील सत्ताधारी जेडी(यू) मधून हकालपट्टी करण्यात आली होती. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर वर्मा म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती आणि ममता बॅनर्जी यांची क्षमता लक्षात घेऊन मी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, बॅनर्जी अनेक विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतील आणि 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाला सडेतोड उत्तर देण्याच्या उद्देशाने चर्चा करण्याची शक्यता आहे. दिल्लीत आल्यावर ममता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतात. मात्र, यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सोनिया गांधींना भेटणार नसल्याचे संकेत तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिले आहेत.

loading image
go to top