
पाकिस्तान, श्रीलंकेत मिळतेय भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल
नवी दिल्ली : भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सरकारी पेट्रोल कंपन्यांनी २२ मार्चपासून आतापर्यंत १५ वेळा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोलने १२२ रुपये लिटर असा उच्चांकी दर गाठला आहे. आपले शेजारी व सध्या राजकीय व आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तान व श्रीलंकेत पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे, हे विशेष.
जगभरातील इंधनाच्या दराचा आढावा घेणाऱ्या ‘globalpetrolprices.com’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार पाकिस्तानमध्ये ४ एप्रिलला पेट्रोलची किंमत ६२.५२ रुपये प्रति लिटर होती. भारताच्या तुलनेत हा दर निम्म्याने कमी आहे. श्रीलंकेत अर्थव्यवस्थेचा डोलारा खिळखिळा झाला असला तरी तेथे पेट्रोलची किंमत ७५.५३ रुपये लिटर आहे. याशिवाय बांगलादेशात ७८.५३ रुपये, भूतानमध्ये ८६.२८, नेपाळला ९६.८० रुपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.
या सर्व देशांपेक्षा आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या चीनमध्ये पेट्रोल महाग आहे. तेथे लिटरमागे ११० रुपये मोजावे लागतात.
जगात पेट्रोलचा सरासरी दर भारतापेक्षा कमी
भारतात पेट्रोलने यापूर्वी शतकी आकडा गाठलेला असून आता दर १२० रुपयांपेक्षाही जास्त आहे. जगाचा विचार करता पेट्रोलचे सरासरी मूल्य १०१.७६ रुपये प्रति लिटर आहे. मात्र भारतात इतर देशांपेक्षा इंधन दरा सर्वांत कमी वाढ झाल्याचा दावा सरकार करीत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे दोन दिवसांपूर्वी भारतातील वाढत्या इंधन दराबाबत निवेदन केले होते. जागतिक बाजारपेठेच्या दबावामुळे देशात इंधनाचे दर वाढ वाढत असून अन्य देशांच्या तुलनेत भारतात ही दरवाढ केवळ ५ टक्के आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. अमेरिकेत पेट्रोलची सरासरी किंमत ५१ टक्के, फ्रान्स ः ५०, कॅनडा ः ५२, जर्मनीः ५५ आणि स्पेनमध्ये ५८ टक्के वाढल्याचे दाखलेही पुरी यांनी दिले आहेत.
या देशांमध्ये आहे सर्वांत महाग पेट्रोल (प्रति लिटरची रुपयांत किंमत)
२१८.८५ हाँगकाँग
१९१.३४ नेदरलँड
१८९ मोनॅको
१८६.५० नॉर्वे
१७९.१४ फिनलंड
या देशांमध्ये आहे सर्वांत स्वस्त पेट्रोल (प्रति लिटरची रुपयांत किंमत)
१.९० व्हेनेझुएला
२.४३ लिबिया
३.८९ इराण
२३.९९ सीरिया
२४.४४ अल्जीरिया
Web Title: Petrol Cheaper Pakistan Sri Lanka Than India Information Global Petrol Price Website Fuel Expensive China
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..