अरेरे.. पेट्रोल एक पैशानेच स्वस्त 

पीटीआय
गुरुवार, 31 मे 2018

दिल्लीत "इंडियन ऑइल'कडून ग्राहकांची थट्टा

नवी दिल्ली, ता. 30 (यूएनआय) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आज पेट्रोलियम कंपनीने ग्राहकांचीच ऑनलाइन थट्टा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. "इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'च्या (आयओसीएल) संकेतस्थळावर आज सकाळी दिल्लीतील पेट्रोलची किंमत 59 पैशांनी कमी झाल्याचे दाखविण्यात आले होते, पण नंतर ही एरर असल्याचे जाहीर करत कंपनीने पेट्रोलची किंमत केवळ एक पैशाने कमी झाल्याचे जाहीर केले. 

कर्नाटक निवडणुकीनंतर सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असून, मागील सोळा दिवसांपासून किमतींचा हा आलेख चढताच राहिला आहे. दरम्यान, आजच्या घोषणेनंतर "इंडियन ऑइल' कंपनी तोंडघशी पडल्यानंतर नेटिझन्सनीही सरकारच्या धोरणांची खिल्ली उडविली. 

पेट्रोलची किंमत (प्रतिलिटर रुपयांत) 
दिल्ली....78.42 
मुंबई....86.23 
कोलकाता...81.05 
चेन्नई.... 81.42 

डिझेलची किंमत (प्रतिलिटर रुपयांत) 
मुंबई....73.78 
दिल्ली....69.30 
कोलकाता....71.85 
चेन्नई....73.17 
 
राहुल यांची टीका 
पेट्रोलची किंमत एक पैशाने कमी झाल्यानंतर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती केवळ एक पैशाने कमी केल्या आहेत. ही सर्वसामान्यांची चेष्टा असून, ते हीन मनोवृत्तीचे लक्षण आहे. आम्ही दिलेल्या "फ्यूएल चॅलेंज'ला तुम्ही एक पैशाचे योग्य उत्तर दिल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला. 

Web Title: petrol price reduce by 1 paisa