नवरा बाहेर आला अन् दोघींनी धू-धू धुतला...

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

एक 26 वर्षीय युवक तिसऱया विवाहाच्या तयारीत होता. याबद्दलची माहिती पहिल्या दोन्ही पत्नींना समजली. दोघीही त्याच्या कार्यालयाबाहेर गेल्या अन्...

कोईमतूर (तमिळनाडू): एक 26 वर्षीय युवक तिसऱया विवाहाच्या तयारीत होता. याबद्दलची माहिती पहिल्या दोन्ही पत्नींना समजली. दोघीही त्याच्या कार्यालयाबाहेर गेल्या. कार्यालयाबाहेर नवरा आल्यानंतर दोघींनी त्याला धू-धू धुतले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, युवकाचा पहिला विवाह 2016 मध्ये झाला होता. विवाहानंतर त्याने काही दिवसातच पत्नीसोबत खटके उडू लागले. तो तिला मारहाण करू लागला. नवऱ्याच्या छळाला कंटाळून ती माहेरी गेली.

2019 मध्ये त्याने पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटच्या माध्यमातून त्याची एका घटस्फोटीत महिलेसोबत ओळख झाली अन् दोघांनी विवाह केला. काही दिवसांमध्ये पुन्हा त्याने दुसऱ्या पत्नीचा सुद्धा छळ सुरु केला. शिवाय, हुंडयाची मागणी करू लागला. दिवसेंदिवस होणाऱया छळाला कंटाळून दुसरी पत्नी पण त्याला सोडून गेली.

दरम्यान, मागली आठवडयात दोन्ही बायकांना त्यांचा नवरा तिसरे लग्न करण्यासाठी मॅट्रीमोनियल साइटवर मुलगी शोधत असल्याची माहिती मिळाली. दोघी एकत्र आल्या व त्यांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. रासीपालायम येथील एका खासगी कंपनीत त्यांचा नवरा नोकरी करतो. दोघी कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यामुळे दोघींनी प्रवेशद्वारावर गोंधळ घालण्यास सुरवात केली. प्रवेशद्वारावरील गोंधळ पाहून नवरा बाहेर आला अन् दोघींच्या तावडीत सापडला. दोघींनी मिळून त्याला प्रवेशद्वारावरच धू-धू धुतले. यावेळी काहींनी मोबाईलमध्ये शुटींग केले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात चर्चा रंगली आहे. सुलूर पोलिस ठाण्यात दोन्ही महिलांनी नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली असून, पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planning to marry for 3rd time man gets thrashed by 2 ex wives outside office