‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा पालकांना सल्ला

PM interacts with students at Pariksha Pe Charcha 2020
PM interacts with students at Pariksha Pe Charcha 2020

नवी दिल्ली - ‘‘जीवनात अपयशच आले नाही, अशी व्यक्ती या जगात विरळाच असेल. पालकांनी मुलांना केवळ मार्कांच्या फुटपट्ट्या लावून परीक्षेला सामोरे जाऊ देऊ नये. अपयशच तुम्हाला यशाकडे नेण्याचा मार्ग दाखवते,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

१० वी व १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या कसोटीतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरांशी तुलना न करण्याचा व पालकांच्या दबावातून परीक्षेचा अतिरिक्त ताण न घेण्याचा मंत्र दिला. अभ्यासासाठी पहाटेची व सूर्योदयाची वेळ चांगली असते कारण तेव्हा मन प्रसन्न असते असेही ते म्हणाले.

मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे तालकटोरा आच्छादित मैदानात झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या संवाद कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात पंतप्रधानांनी देशविदेशातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. महाराष्ट्राची प्रेरणा, जबलपूरची प्राजक्ता अतनकर, केरळचा अरिन डॉमनिक, पंजाबची अरदीप कौर, आंध्र प्रदेशाचा तावेद पॅंवार, अरुणाचल प्रदेशाची तापी अगु तसेच टांझानियाची शाखा खान आदी निवडक विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना पंतप्रधानांनी वेस्ट इंडीजविरुद्ध जखमी होऊनही लारासारख्या फलंदाजाला बाद करणारा अनिल कुंबळे व ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना प्रतिकूल स्थितीत खेचून आणणारे राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण यांची उदाहरणे दिली. ज्या चांद्रयानाचे यश पहायला आपण रात्रभर जागलो त्याच्या अपयशानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीत परतण्याचा कार्यक्रम लांबवून आपण तेथे शास्त्रज्ञांशी संवाद साधला व त्यांच्या निराशेला आशेत परावर्तित करण्याचा प्रयत्न केला आणि तो पाहून साऱ्या हिंदुस्तानातच नव्या आशेचा संचार झाल्याचे पहायला मिळाले, असे त्यांनी सांगितले.

केवळ अभ्यास नव्हे, तर साहित्य, संगीत, कला क्रीडा यांच्याविना अभ्यासच करत राहिलात तर तुमचा रोबो होईल, असे सांगताना ते म्हणाले, परीक्षेत किती मार्क मिळतात हे आयुष्य नव्हे हे लक्षात ठेवा. परीक्षा हा केवळ थांबा आहे, ते साध्य असत नाही. करिअर निवडताना तुमची क्षमता, योग्यता व इच्छा काय, त्यानुसार निवड करा. पालकांनीही आपल्या पाल्याची क्षमता पाहून अपेक्षांचे ओझे टाकावे, असेही ते म्हणाले.

मोदींचे मंत्र...
    २०२० केवळ नवे वर्ष नाही, तर एका दशकाचा प्रारंभ आहे. या दशकातील देशाच्या समृद्धी व विकासात यंदाच्या १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक योगदान असेल.
    एखाद्या गोष्टीत तुम्ही अपयशी झालात तर त्याचाच अर्थ तुम्ही यशाकडे वाटचाल करू लागलात असा आहे.    
    हा काळ तंत्रज्ञानाचा आहे, पण स्मार्ट फोनसारखे तंत्रज्ञान तुम्ही कसे वापरता यावर अवलंबून आहे. स्मार्टफोन तुमचा जेवढा वेळ खातो किंवा चोरतो त्याच्या किमान १० टक्के वेळ आई वडील, आजी- आजोबांबरोबर घालवा.
    पालक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा अंदाज आला पाहिजे. मुलांवर जेवढा दबाव आणाल तेवढे ते त्रस्त होत जातील.

‘पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नये’
‘परीक्षा पे चर्चा’ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नये, असा खोचक सल्ला काँग्रेसने दिला आहे. एवढेच नव्हे तर, मोदी सरकारने अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चात सातत्याने कपात केली असल्याचा टोलाही काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले, ‘‘महत्त्वाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना एकटे सोडावे. त्यांचा वेळ वाया घालवू नये. अशी चर्चा नंतरही मोकळेपणाने होऊ शकते.’’ यूपीएच्या काळात शिक्षणावर एकूण अर्थसंकल्पाच्या ४.६ टक्के खर्च होत होता. २०१८-१९ मध्ये हा खर्च ३.५ टक्के एवढा कमी झाला असल्याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com