
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुजरातमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असं जागतिक संस्थेनं म्हटलंय - PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुजरातमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूरतमधील सौराष्ट्र पटेल सेवा समाजाकडून उभारण्यात येणाऱ्या हॉस्टेलचं भूमीपूजन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना म्हटलं, की जागतिक संस्थेनंसुद्धा म्हटलंय, की कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल, असं त्यांनी सांगितलं.
मोदी म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने वाढ होत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला आता आशा आहे. नुकताच एका जागतिक संस्थेनंसुद्धा म्हटलं, की भारत पुन्हा एकदा जगातील वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख करताना मोदींनी म्हटलं की, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रम हे प्रादेशिक भाषेत शिकण्याचा पर्याय आहे. आता शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही तर शिक्षणाला कौशल्याशी जोडलं जात आहे. देश आपल्या परंपरागत कौशल्यांना आता अधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत आहे.
सबका साथ, सबका विकास हा नारा किती शक्तीशाली आहे हेसुद्धा मोदींनी यावेळी सांगितलं. मोदी म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि त्यात असलेली ताकद ही मी गुजरातमधूनच शिकलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, जातीच्या राजकारणाचा पाठिंबा नसताना गुजरातच्या सेवेची संधी मिळाली. तुमच्या आशीर्वादाची ताकद इतकी मोठी आहे की, आज २० वर्षे झाली अखंडपणे आधी गुजरातची आणि आता देशाची सेवा करण्यास मिळाली.