
"माझे माहेर पंढरी..", या जयघोषात PM मोदींनी केलं पालखी मार्गाचं भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पंढपूरात पालखी मार्गाचे भूमिपूजन झालं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात उपस्थिती लावली. पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायन राणे यांच्यासह वारकऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'माझे माहेर पंढरी आहे, भिवरीच्या तीरी' या ओळींच्या जयघोषात करत उपस्थितांना संबोधित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरूवात केली. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले."मी सर्व वारकऱ्यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो," असे म्हणत त्यांनी उपस्थितांचं अभिनंदन केलं.
भारतावर अनेक हल्ले झाले, शेकडो वर्षांच्या गुलामीत देश होता, वेगवेळी संकटं आली, मात्र भगवान विठ्ठलावरची आपली आस्था आणि वारी सुरूच राहीली. ही यात्रा जगातिल सर्व प्राचीन यात्रा आणि एक लोक चळवळ म्हणुन पाहिली जाते असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. दिंडीत कोणताही भेदभाव नसतो, सर्व वारकरी एकमेकांचे भाऊ बहीण असतात, सर्व विठ्ठलाची मुलं आहे असं म्हणत, यातूनच आपला सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हे ब्रीद निर्माण झालं असं मोदींनी यावेळी सांगितलं.
पंढपूरशी आपलं वेगळं नातं आहे म्हणत त्यांनी, भगवान द्वारकाधीश पंढरीत येऊन विठ्ठल झाले, तसंच पंढरपूर माझ्यासाठी दक्षिण असल्याने देखील माझं नातं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम हे संत दिले असल्याचं म्हणत, त्यांनी पंढपूरची वैशिष्ट्य सांगितली. एकुणच या महामार्गातून सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.