PM मोदींचं मंड्यात दमदार स्वागत; 'रोड शो'त पंतप्रधानांवर चोहो बाजूंनी पुष्पवृष्टी I Karnataka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Karnataka Visit

पंतप्रधान त्यांच्या कर्नाटक दौऱ्यात 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

Karnataka : PM मोदींचं मंड्यात दमदार स्वागत; 'रोड शो'त पंतप्रधानांवर चोहो बाजूंनी पुष्पवृष्टी

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. मंड्याला पोहोचल्यावर पंतप्रधान रोड शो करत आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे देशाला समर्पित करतील.

हा द्रुतगती मार्ग 118 किमी लांबीचा असून तो सुमारे 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. PM मोदींनी मंड्यात रोड शो सुरू करताच लोकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. पीएम मोदींना पाहताच लोकांनी चारही बाजूंनी फुलांचा वर्षाव सुरू केला, त्यामुळं त्यांची गाडी फुलांनी सजलेली दिसत होती. दरम्यान, मोदींनीही जनतेवर पुष्पवृष्टी केली.

आता बेंगळुरू-म्हैसूर प्रवास 75 मिनिटांत होणार

या द्रुतगती मार्गामुळं बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांवरून 75 मिनिटांवर येईल. प्रकल्प NH-275 च्या बेंगळुरू-निदघट्टा-म्हैसूर विभागाच्या 6-लेनिंगवर सुरु आहे. हा द्रुतगती मार्ग दोन्ही शहरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे.

पंतप्रधान त्यांच्या कर्नाटक दौऱ्यात 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान राज्यातील जनतेला अनेक नवीन प्रकल्प भेट देतील. हंपीच्या स्मारकांच्या धर्तीवर बांधलेल्या होसपेट रेल्वे स्थानकाचंही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपसाठी राजकीय महत्त्व असलेल्या वोक्कलिगा बहुल जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर मोदी मद्दूर तालुक्यातील गेज्जलगेरे इथं मोठ्या सभेला संबोधित करतील. मागील सहा दौऱ्यांतील त्यांची मंड्या जिल्ह्यातील ही पहिलीच बैठक असून या बैठकीमुळं प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदी म्हैसूर-खुशालनगर 4 लेन महामार्गाची पायाभरणी करतील. सुमारे 4130 कोटी रुपये खर्चून 92 किमी पसरलेला हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बेंगळुरूशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आणि प्रवासाचा वेळ सुमारे 5 वरून फक्त 2.5 तासांपर्यंत कमी करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

टॅग्स :KarnatakaBjpNarendra Modi