अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine Certificate

अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लस प्रमाणपत्रावरुन हटवण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होती. याबाबतच्या याचिका देखील हायकोर्टामध्ये दाखल करण्या आल्या होत्या. याच संदर्भातील एक मोठी बातमी आत समोर येत आहे. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवण्यात येणार आहे.

देशातील ५ राज्यांमध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झालंय. गेल्या वेळच्या निवडणुकांवेळी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरुन झालेला गोंधळ टाळण्यासाठी सरकारने आता तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार निवडणूक होत असलेल्या ५ राज्यांमधील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवला जाणार आहे.

पाच राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली असून त्यामुळे याठिकाणी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यापैकी पंतप्रधान मोदींचा कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो केंद्र सरकारकडून हटवण्यात येणार आहे. यासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आवश्यक ते फिल्टरही लावणार आहे. सुत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेल्या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी याठिकाणी निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे असा दावा केला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ऑब्रिएन यांनीही पंतप्रधान मोदी लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो हा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग असल्याची तक्रार केली होती. त्यांनी एक पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

त्यानंतर नंतर केंद्रीय निवडणुक आयोगाने या संपुर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून निवडणूक नियमावलीचे पालन करणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. आयोगाने आरोग्य मंत्रालयाला सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाहिरात करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असे सांगितले होते. त्यानंतर या ५ ठिकाणीही लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो हटवण्यात आला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modicovid 19
loading image
go to top